राज्यात आणि देशातील शेवटच्या घटकासाठी काम करणारे बॅरिस्टर ए.आर.अंतुले हे राजकीय क्षेत्रात माझ्या पुढे तर मी त्यांच्या मागे होतो - राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार


म्हसळा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय युवक काँग्रेस पक्षाचे कार्यकारिणीत बॅरिस्टर ए. आर.अंतुले आणि मी जिल्हा आणि राज्य स्तरावर काम करताना बॅरिस्ट ए.आर.अंतुले नेहमी माझ्या पुढच्या स्थानी तर मी त्यांचे रिक्त जागी असायचो असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते, खासदार शरद पवार यांनी म्हसळा येथे आयोजित बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाचे उद्घाटन आणि पंचायत समितीच्या नुतन वास्तू नामकरण सोहळ्याचे कार्यक्रमास संबोधित करताना सांगितले. वसंतराव नाईक कॉलेजच्या प्रांगणात खासदार सुनिल तटकरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या देखण्या कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री आदिती तटकरे,माजी आमदार तथा कॉलेज विश्वस्त अध्यक्ष मुश्ताक अंतुले, निलमभाभी अंतुले, सभापती उज्वला सावंत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, विश्वस्त सचिव अशोक तळवटकर, रायगड जिल्हा काँग्रेस माजी अध्यक्ष आर.सी.घरत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस अलीशेट कौचाली, महेंद्र घरत, नगराध्यक्षा जयश्री कापरे, स्थानिक कमिटीचे चेअरमन फझल हलदे, प्राचार्य जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात खासदार शरद पवार पुढे संबोधित करताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात ठिकठिकाणी शैक्षणिक दालन उभे करण्याची प्रेरणा दिली, कोकण हे भाताचे कोठार असले तरी येथे कृषी आणि मत्स्य व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळाली आहे आता येथे बंदर विकास होणे गरजेचे आहे. कोकणातील दिघी बंदर आणि ठाणे जिल्ह्यातील वाढवल बंदर विकसित होण्यासाठी आमचे प्रयत्न आसुन केंद्राच्या संबंधित मंत्री महोदयांबरोबर माझे घरी खासदार सुनिल तटकरे यांचे उपस्थितीत मिटींग घेऊन चर्चा केली असल्याचे सांगितले. देशाचे पंतप्रधान गुजराल साहेब असताना कोकणात जेएनपीटी सारख्या मोठया बंदर विकासाची मागणी सर्व पक्षाचे नेते मंडळीला एकत्रितपणे घेत केली होती त्याचा व्यापक फायदा झाला आहे आता कोकणात रायगड आणि ठाण्यातील बंदर विकासासाठी आमचे प्रयत्न आहेत.कोकणाला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर खासदार सुनिल तटकरे यांनी मागणी केलेला रेवस रेड्डी रस्ता लवकरच विकसीत करण्यात येणार आहे त्या साठी राज्य शासनाला सुचना देण्यात येतील तसेच नव्याने स्थापित झालेल्या विज्ञान महाविद्यालयाला अध्यक्ष मुस्ताक अंतुले यांनी अनुदानाची मागणी केली आहे त्याची पूर्तता खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे करतील असे सुचित केले.या वेळी खासदार पवार यांनी बॅरिस्ट अंतुले यांच्या राजकिय जीवनातील अनेक आठवणी सांगताना ते आमदार झाले तेव्हा  ते करीत असलेले पक्षाचे नेतृत्व माझ्याकडे आले, जेव्हा ते मंत्रिमंडळात मंत्री झाले तेव्हा मी आमदार झालो, जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा आमचे राजकीय वैमनस्य झाले आणि मी विरोधीपक्ष नेता झालो पण आमची मैत्रीत संवादात कधी खंड पडला नाही असे करता करता केंद्रात आम्ही पुन्हा मंत्री म्हणून एकत्रितपणे काम केले तेव्हा बॅरिस्ट अंतुले आरोग्यमंत्री आणि मी देशाचा संरक्षणमंत्री म्हणून काम केले असल्याची आठवण करून दिली. अंतुले यांनी दूरदृष्टी ठेवून काम करताना सर्वसामान्य माणसाला शिक्षण आणि शेवटच्या घटकाला समान हक्क मिळाला पाहिजे असे काम केले आहे. म्हसळा सारख्या ग्रामीण भागात त्यांनी उच्च शिक्षणासाठी दालन उभे केले आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहील असे आश्वासन देताना पक्षाचे मार्फत बॅरिस्ट ए.आर.अंतुले महाविद्यालयाला पाच लक्ष रुपये देण्यात येतील असे जाहीर केले. यावेळी खासदार शरद पवार यांनी आम्ही दिलेले पाच लाख रुपये खर्च न करता ती रक्कम कायमस्वरूपी फिक्स डिपॉझिट करून त्या रकमेच्या व्याजातून मिळणारी रक्कम दरवर्षी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एक मुलगा आणि एका मुलीला बॅरिस्ट अंतुले आणि नर्गिस अंतुले यांच्या नावे शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी सुचना कॉलेजचे विश्वस्त अध्यक्ष मुश्ताकभाई अंतुले यांना दिली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बॅरिस्टर अंतुले हे माझे राजकीय जीवनातील आदर्शवत नेते होते. वडिलोपार्जित त्यांचा राजकीय वारसा लाभला असल्याने त्यांचे जनतेची सेवा करण्याचे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खासदार शरद पवार साहेबांनी मला संधी दिली असल्याचे सांगितले. बॅ.अंतुले यांनी राज्यात, देशात आणि कोकणात केलेली सेवा सुविधाचा पाढा वाचताना विशेष करून संजय गांधी निराधार योजना,पल्स पोलिओ, रस्ते, विज, पाणी, आरोग्य सेवेच्या कार्याची माहिती दिली. राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांनी रायगड जिल्ह्यात पालकमंत्री ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वी काम केले आहे. कोकण रेल्वे प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आदरणीय शरद पवार यांनी कोकण, गोवा, कर्नाटक राज्यांना एकत्रित करून रेल्वे सेवा सुरू करण्यात यश मिळवले. त्यावेळी मधू दंडवते आदी नेतृत्वाची आठवण करून दिली. बॅ.ए. आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाला शासनाच्या वतीने योग्य सहकार्य मिळेल असे सांगताना या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून राष्ट्रीय नेते पवार साहेबांनी पालकमंत्री काम केले आहे तेव्हा पालकमंत्री आदिती हिला भरपूर काही शिकण्या सारखे असल्याचे नमुद केले. खासदार तटकरे यांनी बॅरिस्ट ए.आर.अंतुले आणि राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या कामाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.रायगड जिल्ह्यात त्यांना दोन वेळा खासदार करण्यासाठी निवडणूक प्रचारा कामी पवार साहेबांचे मोठे योगदान आहे. रेवस रेड्डी होणाऱ्या मार्गास बॅ.अंतुले हे विशेष प्रयत्नशील होते या होणाऱ्या मार्गास बॅरिस्टर अंतुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी खासदार सुनिल तटकरे यांनी खासदार शरद पवारांकडे केली. 

अध्यक्ष मुस्ताक अंतुले यांनी मनोगत व्यक्त करताना 1990 मध्ये बॅ.अंतुले यांनी ग्रामीण भागातील गरीब गरजु घटकाला उच्च शिक्षणासाठी म्हसळा, मुरुड सारख्या शहरात शासन स्तरावर मंजुरी मिळवून दालन उभे केले. मोठया शहरात जाऊन येथील मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश आणि हॉस्टेल मध्ये राहणे परवडत नाही ती सेवा येथे उपलब्ध केली आता या विद्यालयात विज्ञान शाखेला मंजुरी मिळाली आहे या विद्यालयाला अनुदान मंजुर करावे अशी मागणी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. अंतुले साहेब आणि पवार साहेब यांचे कौटुंबिक नाते वेगळे आसुन पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी अंतुले साहेबांच्या धाकट्या मुलीचा साखरपुडा वर्षा बंगल्याच्या बाजुलाच तोरणा बंगल्यात संपन्न केल्याची आठवण करून दिली. म्हसळा शहराचा विस्तारीकरण करण्यासाठी एकाच जागेवर चार ते पाच मजली भव्य शासकीय इमारत उभी करण्याची मागणी केली.या वयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार म्हसळा सारख्या ठिकाणी येवुन बॅरिस्ट ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाचे उदघाटन करण्याची संधी दिल्या बद्दल त्यांचे माजी आमदार मुस्ताक अंतुले यांनी मनोमन धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती उज्वला सावंत यांनी तर आभार विद्यालयाचे विश्वस्त सचिव अशोक तळवटकर यांनी मानले.
कोविड 19 चे प्रादुर्भावाचे अनुषंगाने कार्यक्रम अगदी मोजक्याच मान्यवरांचे उपस्थितीत वसंतराव नाईक कॉलेजच्या प्रांगणात संपन्न झाला. सुरुवातीला म्हसळा पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे बॅ.ए. आर.अंतुले भवन असे नामकरणाचे उदघाटन खासदार शरद पवार यांचे हस्ते करण्यात आले. म्हसळा शहरातील व्यापारी वर्गाने खासदार शरदचंद्रजी पवार यांचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार शरद पवार यांच्या म्हसळा येथील कार्यक्रमात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्हीआयपी व्यतिरिक्त त्यांच्याजवळ जाण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आली नव्हती. कार्यक्रमाला खासदार शरदचंद्रजी पवार हे हेलिकॉप्टरने वेळेत उपस्थित राहिले होते. कोरोना प्रादुर्भाव बाबतीत शासकीय अधिकारी वर्गाने योग्य ती दखल घेतली होती.

Popular posts from this blog