बोर्लीपंचतन येथे फिरत्या पशु चिकित्सालय वाहनाचा लोकार्पण सोहळा संपन्न
बोर्लीपंचतन (मुजफ्फर अलवारे) : राज्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पशुपालकांना आपल्या पशुरूग्णांवरील उपचारासाठी बऱ्याचदा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पाळीव जनावरांचा मृत्यु होऊ शकतो. तसेच केंद्र शासनाने लाळखुरकुत रोगमुक्त प्रदेशासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे. त्यामुळे पशुरोगांचे प्रभावी नियंत्रण करणे आवश्यक आहे. या बाबी विचारात घेऊन, राज्याच्या दुर्गम भागासह पशुधनाच्या तुलनेत पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा असणाऱ्या तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात ऐंशी तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.श्रीवर्धन तालुक्यासाठी मंजुर झालेल्या फिरत्या पशुचिकित्सा वाहनाचे लोकार्पण आज बोर्लीपंचतन ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. १९६२ या टोल फ्री क्रमांकावर फोन करताच अती दुर्गम भागात पशु वैद्यकिय सेवा पोहचु शकत नाही तेथे तातडीने हे वाहन पोहचून सेवा देणार असल्याने पशुपालकांना त्याचा लाभ होणार असून वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष निमुणकर (फिरते रुग्णालय), सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. बिरवाडकर, बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.