विळे ते पाटणूस रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर, मात्र पाटणूस ते भिरा रस्त्याची पूर्ण वाताहात
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस ते विळे रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गांवर आहे. गतवर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये सा. बां. विभाग महाड यांच्या अखत्यारीत या रस्त्याचे काम सुरू झाले होते. परंतु लॉकडाऊनमुळे गेले आठ-नऊ महिने काम थांबले होते. लॉकडाऊन शिथील होताच काम पुन्हा सुरू झाले असून ते आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या मार्गावरील पुलालाचेही काम लवकरच पूर्ण होईल असे दिसते आहे. यापूर्वी विळे-पाटणूस रस्ता अतिशय खडतर, अरुंद व वळणावळणाचा होता त्यामुळे वाहनचालकांना वाहने अतिशय सावधपणे चालवावी लागत होती. तरीही अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत होते. मात्र आता रस्त्याचे रुंदीकरण झाले असून या मार्गात येणारी अवघड वळणे सुध्दा तोडण्यात आल्याने मार्ग सुकर झाला आहे. डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात असून या मार्गावरील विळे नदीवरील पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तेही लवकरच पूर्ण होईल असे दिसते आहे.मात्र पाटणूस ते भिरा रस्त्याची पूर्ण वाताहात झाली असून या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणे अपेक्षित आहे. पाटणूस ते भिरा मार्ग जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीत येत असून गेली 15 वर्षे जिल्हा परिषदचा एकही अधिकारी इकडे फिरकला नसल्याने या रस्त्याची अशी अवस्था झाली आहे. सन 2005 साली त्या काळचे सरपंच दिपक बामगुडे यांच्या आग्रहास्तव टाटा पॉवर भिरा कंपनीने पाटणूस ते भिरा रस्त्याचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर जवळ पास 15 वर्षे जिल्हा परिषदने या रस्त्याकडे लक्षच दिले नसल्याने या मार्गावरील रस्ता पूर्ण मातीचा झाला आहे. विळे पाटणूस रस्त्याप्रमाणेच पाटणूस भिरा रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सुद्धा जिल्हा परिषद च्या मार्फत व्हावा अशी या परिसरातल्या ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.