खार जमीन संशोधन केंद्रासाठी गिरणे (तळा) गावातील 47 हेक्टर जमीन हस्तांतरणाचे आदेश पारित
तळा (संजय रिकामे) : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात तळा तालुक्यातील गिरणे गावातील 47 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकारी चौधरी यांनी जमीन हस्तांतरणाचे आदेश पारित केले आहेत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी या महत्वाच्या बाबीसाठी सतत पाठपुरावा केला होता.
खार जमीन संशोधन केंद्र पनवेल हे खार जमिनीवर संशोधन करणारे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र आहे. समुद्रालगतच्या खारवट जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि क्षार प्रतिकारक भात जातीच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत या कृषी संशोधन केंद्राची स्थापना सन 1943 मध्ये करण्यात आली. सन 1959 मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. हे संशोधन केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत विद्यापीठाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. या संशोधन केंद्राच्या अधिपत्याखाली पनवेल येथे 12.80 हेक्टर तसेच पारगाव येथे 20.24 हेक्टर असे एकूण 33.04 हेक्टर क्षेत्र होते. दरम्यान पारगाव क्षेत्रातील 20.24 क्षेत्र हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सिडकोने संपादित केले. पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात खार जमीन संशोधन केंद्रास पर्यायी खार जमीन देण्याचे सिडकोने आश्वासित केले होते.
खाडीलगत शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रामार्फत विविध शिफारशी तंत्रज्ञान तसेच क्षार प्रतिकारक भात जातींची निर्मिती व बीजोत्पादन केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने खार जमीन संरक्षणासाठी बाह्यकाठ बांधणी, पाणी निचरा व्यवस्थापन, सुधारित भात लागवड पद्धती जमिनी आहेत. पारगाव व पनवेल केंद्रावर राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशन एसटीआर-एस प्रकल्प आयआरआरआय आदि संशोधन प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. पारगाव प्रक्षेत्राची कार्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. क्षार प्रतिकारक भात जाती निर्माण करण्याबाबत संशोधन व क्षार प्रतिकारक भात जातींचे बीजोत्पादन विविध संशोधनात्मक प्रकल्प राबविण्याकरिता पनवेल परिक्षेत्राची जागा अपुरी पडत होती. संशोधन कार्य चालू ठेवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान त्या अनुषंगाने रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे तळा तालुक्यातील तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमवेत विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक खारजमीन शास्त्रज्ञ व इतर अधिकारी यांची 06 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील तळा तालुक्यातील गिरणे येथील 47.70 हेक्टर सरकारी जमिनीची पाहणी केली. ही जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असून या क्षेत्रावर खारजमीन संबंधी संशोधन प्रकल्प तसेच तंत्रज्ञान पूर्ववत चालू करणे शक्य असल्याने स्पष्ट झाले होते. शासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन तळा तालुक्यातील गिरणे गावातील ही जागा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांना हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले आहेत.
खार जमीन संशोधन केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली अंतर्गत विद्यापीठाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. या संशोधन केंद्राच्या अधिपत्याखाली पनवेल येथे 12.80 हेक्टर तसेच पारगाव येथे 20.24 हेक्टर असे एकूण 33.04 हेक्टर क्षेत्र होते. दरम्यान पारगाव प्रक्षेत्रावरील 20.24 हे क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता सिडकोने संपादित केले. पारगाव प्रक्षेत्राच्या जमिनीच्या मोबदल्यात खार जमीन संशोधन केंद्रास पर्यायी खार जमीन देण्याचे सिडकोने आश्वासित केले होते. त्यानुसार पर्यायी जमीन मिळाल्याने खार जमीन संशोधन केंद्र उभारणीस गती मिळणार आहे.