जय भवानी तरूण मंडळ गावठण यांच्या वतीने क्रिकेटचे भव्य सामने संपन्न
पत्रकार रविना मालुसरे, अधिपरिचारिका अस्मिता कदम कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यातील नावाजलेल्या जय भवानी तरूण मंडळ गावठण आयोजित व शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन संचलित भव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडल्या. क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनाबरोबरच जय भवानी तरूण मंडळ गावठण यांनी सामाजिक जाणीवेचा भावनेतून कोरोना काळात स्वतःच्या जीवाची तमा न करता इतरांना प्रेरणादायी ठरेल असे समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा लढवय्या कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला.
मालसई गावच्या पत्रकार कु. रविना नारायण मालुसरे यांनी आपल्या जिव्हाळा चॅरिटेबल ट्रस्ट ह्या सामाजिक संस्थेमार्फत कोरोना काळात मोफत मास्क वाटप, अल्पोपहार वाटप इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
गावठण गावच्या मूळ रहिवासी असलेल्या व शासकीय रुग्णालयात अधिपरिचारिका पदावर कार्यरत असलेल्या सौ. अस्मिता अरविंद कदम यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन मंडळाने त्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले.
क्रिकेट स्पर्धा व कोरोनायोद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत धामणसई सरपंच सौ. नेहा निलेश जंगम, ग्रामपंचायत सदस्य शैलेश नारायण कदम, सामाजिक कार्यकर्ते महेश तुपकर, अरविंद कदम, अनिल देशमुख, भातसई शिवसेना विभाग प्रमुख दीपक कदम, तसेच जय भवानी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मंडळ गावठण व पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते.
खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक जय भवानी मुठवली, द्वितीय क्रमांक जय बजरंग लांढर तर तृतीय क्रमांक जे.बी.एस. धामणसई या संघानी पटकावला. मंडळाच्यावतीने उत्कृष्ठ फलंदाज योगेश निकम, गोलंदाज सौरभ भगत, मालिकावीर अनिकेत शेळके, बेस्ट कॅचर प्रसाद भगत, प्लेयर ऑफ द डे अविनाश शेळके यांना सन्मानित करण्यात आले.