श्री चंडिका ग्रामदेवीचा उत्सव उत्साहात संपन्न
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यातील नवसाला पावणारी आणि तळेवासियांची श्रध्दास्थान असलेली श्री चंडिका ग्रामदेवी उत्सव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. तळा तालुक्यातील बारा वाड्यांचे हे ग्रामदेवता मंदीर शहरातील अठरा पगड जाती या मंदीर सोहळ्यात समाविष्ट होत असतात. देवीचा अभिषेक, पुजा अर्चा, होम हवन षोडशोपचार पुजा आणि सर्व गावातून वाजत गाजत येणारे पालखी सोहळे हे जणु गावातील आगळी-वेगळी पर्वणीच वाटते. ढोल ताशांच्या गजरात बारा वाडयांतील पालखी आपल्या मुख्य चंडिका मातेच्या मंदिरात पोहचतात. फुलांनी सजवलेल्या पालख्या पारंपारिक वेश परिधान करुन भक्तगण हातात भगवे झेंडे आणि खांद्यावर पालखी घेत ढोल ताशांच्या गजरात मंदिराकडे रवाना होतात. मंदिरात यज्ञ जपत्याग करणारे ब्राम्हण देवीची षोडपचार पुजा यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होउन गेले होते.
मंदिरासमोर भक्तांसाठी भव्य प्रांगणात उभारलेले मंडप भक्तांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा देवीच्या मिळालेल्या दर्शनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरिल प्रसन्नता यावेळी जाणवत होती. देवीच्या दर्शनानंतर भाविकांना महाप्रसादाची सोय केली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईलाजाने यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. असंख्य भाविक आवडीने आनंदाने चंडिका मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. यामध्ये तळा शहरातील शाळा, महाविद्यालय, आयटीआय काॅलेज येथील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, व्यापारी, डाॅक्टर्स, पत्रकार, प्रतिष्ठीत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असतात. भाविकांची श्रध्दा आणि भक्ती यामुळे सारा परिसर भक्तीमय होऊन गेला होता पुर्वापार या मंदिरात साऱ्या वतनदारांना मिळत असलेला पुजेचा अधिकार लाभ वतन जतन करुन ठेवणारी ही श्री चंडिका भवानी माता यांचे मंदिर ट्रस्ट उत्सव सोहळा आगळा वेगळा साजरा होत असतो.
महेंद्र बाळकृष्ण कजबजे : चंडिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष
नवसाला पावणिरी अशी ख्याती असणारी श्री चंडिका देवीचा ग्रामोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडत असतो. या उत्सवाची तालुक्यातील बारा वाड्यातील सर्व धर्मातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात. दोन दिवस हा उत्सव असतो. याठिकाणी भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा जिल्ह्याच्या पर्यटन आणि पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे यांच्याकडे ट्रस्टच्या वतीने करणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे बोलताना सांगितले.