घर सोडून निघून गेलेल्या मुलाला अवघ्या पाच तासांत पालकांच्या हवाली केले, कोलाड पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी
रोहा (रविना मालुसरे) : कोलाड येथील रहिवासी श्री. मोरेश्वर जाधव यांनी पोलीस ठाण्यात दुपारी दोन वाजता आपला मुलगा कु. आदित्य हा घरातून निघून गेला आहे व त्याचा मोबाईलही बंद आहे अशी माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सायबर क्राईम सेल शाखेकडून मुलाचे मोबाईल लोकेशन ट्रेस करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता मुलाचा फोन सुरू झाला व त्याचे मोबाईल लोकेशन बेलापूर नवी मुंबई हे येत होते. त्याच दरम्यान कोलाड येथील फॉरेस्ट कर्मचारी शासकीय काम उरकून मुंबई येथून कोलाड येथे परतत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याबरोबर समन्वय साधून त्यांना मुलाचे लोकेशन पाठविण्यात आले. पुढील कामगिरी फॉरेस्ट स्टाफने अचूक पार पाडली. त्यांनी लोकेशन प्रमाणे मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व कोलाड येथे सुखरूप आणून सोडले .
अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच केवळ पाच तासात मुलाचा शोध लागून त्याचे समुपदेशन करून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. कोलाड पोलीसांनी दाखविलेली तत्परता हा कौतुकाचा विषय झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. ठाकूर, सायबर क्राईम सेलचे पोलीस शिपाई अक्षय पाटील, फॉरेस्ट अधिकारी श्री. संजय चव्हाण, श्री. वारगुडे, श्री. विजय पाटील यांनी तपासात अमूल्य योगदान दिले.