जय भवानी तरूण मंडळ गावठाण यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार
रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यातील जय भवानी तरूण मंडळ गावठाण यांनी प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात आपल्या देशाचे रक्षण करणारे वीर जवान तथा आपल्या पंचक्रोशीतील मालसई गावचे सुपुत्र श्री. मिलिंद चाळके यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्राणाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्याची जय भवानी तरूण मंडळ व ग्रामस्थ मंडळ गावठाण यांची प्रामाणिक इच्छा होती. तो योग जुळून आला थेट प्रजासत्ताक दिनी. नेहमी भारत-पाक सिमेवर काश्मीरमध्ये बर्फाच्छादित भागात खडा पहारा देणारे शुर सैनिक श्री. मिलिंद चाळके सुट्टीवर आपल्या गावी आले होते. मंडळाने केलेल्या विनंतीनुसार श्री. मिलिंद चाळके कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
जय भवानी तरुण मंडळ गावठाण यांनी गावच्या मंदिराचे पुजारी श्री. विठोबा भोकटे यांच्या शुभहस्ते श्री. मिलिंद चाळके यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
ग्रामस्थांच्या प्रेमाने आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया श्री. मिलिंद चाळके यांनी व्यक्त केली. जय भवानी तरुण मंडळ गावठाण यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.