आघाडीचे सरकार असले तरी रायगड जिल्ह्यात शिवसेनेचेच वर्चस्व राहील - आ. महेंद्र थोरवे
तळा (संजय रिकामे) : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सत्ताधारी शिवसेने जोरदार तयारी केली असून त्याच पार्श्वभुमीवर विविध विकासकांमे उदघाटन आणि भुमिपूजन कर्जत-खालापुरचे आ. महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या उद्घाटन आणि भुमिपूजन प्रसंगी आ. महेंद्र थोरवे यांनी राज्यात आघाडीचे सरकार असले तरी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचेच वर्चस्व राहील असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, माजी आ. अवधुत तटकरे, नगराध्यक्षा सौ. रेश्मा मुंढे, उपनगराध्यक्षा सौ. सायली खातु, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, नगरसेवक नगरसेविका विविध ग्रामपंचायतीतील सरपंच आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
थोरवे पुढे म्हणाले की, श्रीवर्धन मतदार संघात शिवसेनेचे प्राबल्य आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना दोन नंबरचा पक्ष आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यमातून विकास कामाची गंगा वाहत असुन रायगड जिल्हा देखील विकासकामांसाठी वंचित राहणार नाही याची खात्री मी देतो त्यासाठी जिल्ह्यातील तीन आमदार यांना सोबत घेत विकासकामे कमी पडू देणार नाही, विविध प्रलंबीत कामे असतील ती देखील पूर्ण केली जातील. निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. शिवसैनिक हा खरा लढवय्या असतो. रायगड जिल्हा महाराष्ट्रात एक नंबरला राहण्यासाठी संघटना तळा गाळापासुन मजबूत करा असेही त्यांनी सांगितले. आ. भरतशेठ गोगावले आणि आ. महेंद्र दळवी महत्वाच्या कामामुळे येऊ शकले नाहीत अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.
तळा नगरपंचायत निवडणूक माजी आ. अवधुत तटकरे सक्रीय
तळा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळ्यात माजी आ. अवधुत तटकरे यांनी मी मागील पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असलो तरी तळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेसाठी माझा आमदार निधी मोठ्या प्रमाणात खर्ची केला असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पुन्हा भगवा झेंडा फडकविण्यासाठी लागणारे सर्व सहकार्य माझ्याकडून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
महाआघाडीत बिघाडी, पालकमंत्र्यांना डावळले?
तळा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांचे उदघाटन आणि भुमीपुजन आज तळा शहरात पार पडले. परंतु या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांना डावळण्यात आले असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यामुळे तळा नगरपंचायतीत महाआघाडीत बिघाडी झाली असल्याचे बोलले जात आहे.