पाली-भिरा एसटी सेवा सुरू, पण सेवा तुटपुंजी! दिवसभरात एसटीची एकच फेरी!

शाळा-कॉलेजचे विद्यार्थी करतात खाजगी वाहनातून प्रवास

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील पाटणूस भिरा येथे सुधागड तालुक्यातील पाली बस स्थानकातून दिवसभरात सहा-सात एसटी बसच्या फेऱ्या होतात. त्यामुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होतो. शिवाय पाली ते पाटणूस भिरा मार्गात येणारी जी गावे आहेत त्यांना पाली बाजार पेठ जवळ असल्याने खरेदीसाठी जाता येते. लॉकडाऊनमुळे गेली सात-आठ महिने एसटी बस सेवा खंडित झाली होती त्यामुळे ग्राहकांना पालीला जाता येत नव्हते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पाली-भिरा बस सेवा पूर्ववत सुरू होईल असे प्रवाशांना वाटत होते. परंतु पाली-भिरा करिता पेण डेपोची केवळ एकच एसटी बस सकाळी 10.15 वा. पाली डेपोतून सुटते ती भिरा येथे 11 वा. पोहचते व परत पाली कडे रवाना होते. परंतु परत येण्यास दुसरी बस नसल्याने या एसटी बस ला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. पूर्वीसारख्या सर्वच एसटी बस सुरू झाल्या तर शाळा कॉलेजचे विद्यार्थी व नियमीत पालीला जाणाऱ्या प्रवाश्यांना अत्यंत सोईचे ठरेल व पूर्वीप्रमाणे एसटी बसला प्रवाश्यांची गर्दी होईल. पालीतून भिरा पाटणूस करिता येणाऱ्या बहुतांश एसटी बस या कर्जत डेपोच्या असतात त्यामुळे कर्जत एसटी डेपोच्या आगार प्रमुखांनी परवानगी देऊन या एसटी बस पूर्ववत कराव्यात अशी या परिसरातील प्रवाश्यांची प्रमुख मागणी आहे.

Popular posts from this blog