पाटणूसचा तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक!
लहानपणापासूनच पी.एस.आय. बनण्याचे स्वप्न पाहणारा व ते सत्यात उतरवणारा पाटणूसमधील पहिलाच तरुण
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : लहानपणी शालेय जीवनात असताना किंवा १० वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही कोण होणार? किंवा कोण व्हावंसं वाटतंय? असा प्रश्न विचारला जातो. अशा वेळी डॉक्टर, वकील, वैमानिक, पोलीस इन्स्पेकटर वगैरे होण्याची इच्छा विद्यार्थी प्रगट करतात. सर्वच विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होतातच असे नाही, मात्र काही विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करीत आपले स्वप्न पूर्ण करतातच!
माणगांव तालुक्यातील पाटणूस गावचा तरुण सुनील लक्ष्मण म्हामुणकर याने शालेय जीवनात असताना पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) बनण्याचे स्वप्न पाहिले होते. ते त्याने पूर्ण केले आहे. मात्र पी.एस.आय. बनण्यासाठी त्याला कसून अभ्यास तर करावा तर लागलाच परंतु अनेक अडचणींचा सामनाही करावा लागला. सुनील म्हामुणकर यांचा पोलीस अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचकारी आहे. त्यांचे पूर्ण शिक्षण पुणे येथे झाले. जनतेची सेवा करण्याचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबा व वडिलांकडून लाभला. सुनील यांचे वडील पोलीस शिपाई ते असिस्टंट सब इन्स्पेक्टर पर्यंत पदोन्नती करीत पोहचले व निवृत्त झाले. आपण पी.एस.आय. या पदापर्यंत पोहचलो नाही. निदान आपण हयात असेपर्यंत आपल्या मुलाने तरी एक पोलीस अधिकारी बनून आपले स्वप्न पूर्ण करावे असे सुनील च्या वडिलांना नेहमी वाटे आणि म्हणूनच सुनीलने पोलिसांत भरती होण्यासाठी प्रयत्न केले. पुण्यात ज्या-ज्या वेळी पोलीस भरती असायची त्या-त्या वेळी सुनील प्रयत्न करायचा. परंतु जात मराठा असल्याने आरक्षण आडवे यायचे आणि सुनीलची निवड रद्द व्हायची. शेवटचा प्रयत्न म्हणून सुनीलने रायगड मध्ये पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला आणि येथे मात्र त्याची स्वप्नपूर्ती होऊन रायगड पोलीस खात्यात सुनील भर्ती झाला. काही वर्षं रायगड जिल्ह्यात सेवा करून त्याची पुणे पोलीस खात्यात नियुक्ती झाली. मुळातच शालेय जीवनात अभ्यासात हुशार असणाऱ्या सुनीलचे अक्षर हि वळणदार होते. म्हणून सुनीलने पुण्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये रायटर शिप म्हणून कर्तव्य बजावले. रायटरचे काम करीत असताना त्याची कायद्यावरील पक्कड मजबूत झाली. सुबक अक्षर असल्याने वरिष्ठ अधिकारी त्याला रायटर शिप म्हणून पहिली पसंती देत असत. पुढे पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल असा बढतीचा प्रवास करीत त्याने पहिल्याच प्रयत्नात जिद्दीने खात्यामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण होऊन सुनील पी.एस.आय. झाला व आशा तऱ्हेने सुनील ने पी.एस.आय. होण्याचे आपले व वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. पाटणूस पंचक्रोशित मराठा समाजातून पी.एस.आय. होणारे सुनील महामुणकर हे पहिलेच तरुण असल्याने पाटणूस पंचक्रोशीतून तसेच त्यांचे कुटूंबीय व पुण्यातील मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.