पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन
मूलभूत सुविधा पूर्ण करत असताना कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल - आदिती तटकरे
तळा (कृष्णा भोसले) : तळ्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या तळगडाच्या पायथ्याशी जाणार्या रस्त्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, सभापती अक्षरा कदम, युवती अध्यक्षा अॅड. सायली दळवी, तालुका अध्यक्षा जानवी शिंदे, तालुका अध्यक्ष नथुराम अडखळे, नगरसेवक चंद्रकांत रोडे नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, महेंद्र कजबजे, अॅड. उत्तम जाधव, नगरसेवक चंद्रकांत भोरावकर, मंगेश शिगवण, निलेश कदम, नागेश लोखंडे, सचिन कदम, अधिकारी वर्ग, ग्रामस्थ, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, खरे पाहता हा किल्ला परिसर दुर्लक्षितच राहिलेला आहे. याची पर्यटक आणि शिवप्रेमी येण्याची मोठी क्षमता आहे. म्हणून या सर्व गोष्टी जाणून एका बाजूला आपल्या गावाचा सुद्धा विकास झाला पाहिजे, परिसराचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर हा गड सुद्धा राखला गेला पाहिजे. ज्या गडाच्या नावावर आपला तालुका उभा आहे त्या गडाचे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. हा गड ए एस आय मानांकित असल्यामुळे येथे परवानगी मिळविण्यासाठी थोडा कालावधी आपल्याला लागत आहे परंतु आपण सुशोभीकरणाचे काम अशा पद्धतीने घेतलेले आहे. ग्रामस्थांच्या जाण्या-येण्याचे मार्ग आहेत ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतील आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये येणारे शिवभक्त आहेत त्यांना सुद्धा ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल ही गेल्या अनेक वर्षापासूनची इच्छा होती.
त्यानिमित्ताने त्याच्यातील एक पहिलं पाऊल टाकलेला आहे. जिल्ह्यामध्ये कुठेही नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आपल्या परिसरामध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी उभारलेले आहे. निश्चितपणे त्याचं सुद्धा आपल्याला नूतनीकरण करायचा आहे. आदरणीय तटकरे साहेबांचा हातभार लागलेला आहे आणि या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे भाग्य समजते! मला या ठिकाणी हातभार लावण्याची संधी मिळेल. जो निधी आलेला आहे त्यात काम सुरू करावं व अधिक निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देण्याची मी ग्वाही देते.
आज आपण ज्या रस्त्याचे भूमिपूजन करत आहोत त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचा काही दीडशे ते दोनशे मीटरचा रस्ता देखील वाढीव घेणार असून त्याला लागणारा निधी देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
येथे विजेची जी कमतरता भासणार आहे ती कमतरताही पूर्ण करण्यासाठी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मूलभूत सुविधा पूर्ण करत असताना त्यामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.