त्रिपुरारी पौर्णिमेत रायगड उजळला
शिवभक्तांनी केले दिपोत्सवाचे आयोजन
माणगांव (राजन पाटील) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या किल्ले रायगडावर मावळा संघटना रायगड, जनसेवा संघटना रायगड, कोकणकडा मित्र मंडळ रायगड यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सवाचे आयोजन करून रायगड उजळविण्याचे काम केले.
छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-जमातींना घेऊन हिंदवी स्वराज्य उभे केले. अर्थात, त्यामुळेच आज आपण हे सोन्याचे दिवस पाहू शकतो. त्याचे स्मरण म्हणून दरवर्षी मावळा संघटना रायगड यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी मावळा संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील व सहकारी, कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक मोरे व सहकारी, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर, सचिव योगेश पालकर, सहसचिव योगेश खडतर, रायगडवाडीचे सरपंच प्रभाकर सावंत, पाचाड ग्रामपंचायतीच्या सरपंच निवेदिता गायकवाड, माजी सरपंच लहू औकीरकर, ग्रा.पं. सदस्य गणेश औकीरकर, महेश मोरे, रोहित पवार यांच्यासह असंख्य शिवभक्त, शिवप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिकेत ठाकूर यांनी या रायगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या रायगड विकास प्राधिकरणातील भ्रष्टाचाराविषयी शिवप्रेमींना माहिती दिली व आवश्यक वाटल्यास रायगड विकास प्राधिकरणाच्या विरोधात जनआंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच या जनआंदोलनात सर्व शिवभक्तांनी सामिल होण्याचे आवाहन केले.
यावेळी शेकडो शिवभक्तांनी प्रेरणादायी सामूहिक गीतांचे सादरीकरण व घोषणा देऊन रायगड किल्ल्याचा परिसर दणाणून सोडला.