आडमुठ्या ग्रामसेवकामुळे रामजी शिंदे यांचे कडसुरे ग्रां.पं. समोर उपोषण!
रोहा (प्रतिनिधी) : रामजी कृष्णा शिंदे हे कडसुरे ग्रा.पं. हद्दीतील रहिवासी आहेत. याठिकाणी त्यांचे वडिलोपार्जित घर, जमीन, शेती आहे. त्यांना कडसुरे ग्रा.पं. मधून सर्व प्रकारचे दाखले गरजेनुसार प्रत्येक वेळी नियमानुसार मिळत होते. त्याबाबत त्यांची कोणतीही तक्रार नव्हती.
मात्र मागील दीड वर्षापासून येथे नवीन ग्रामसेवक आले तेव्हापासून साधा रहिवाशी दाखला मिळणे देखील कठीण झाले आहे, तसेच घराचा अॅसेसमेंट उतारा मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अनेक अर्ज केले. मात्र त्याबाबत ग्रामपंचायतीकडून नेहमीच आडकाठी व टाळाटाळ करण्यात आली. त्याकामी कधी लाच, तर कधी दंडाची मागणी करण्यात आल्याची रामजी शिंदे यांची तक्रार आहे.
कोव्हीड-१९ च्या महामारीमुळे मोलमजूरी करून स्वतःच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रामजी शिंदे यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांनी स्वतःचे घर गहाण ठेवण्याकरिता त्यांना ग्रामपंचायतीमार्फत काही कागदपत्रांची आवश्यकता होती. मात्र वारंवार विनंती अर्ज करून देखील त्यांच्या अर्जांना 'केराची टोपली' दाखविण्यात आली. अशा प्रकारे अन्याय झाल्यामुळे त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, नागोठणे पोलीस ठाणे यांच्याकडे निवेदन सादर केले होते.