श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब येथील शिक्षीका अनुराधा म्हात्रे यांना रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
रोहा (रविना मालुसरे) :
रोहा तालुक्यांतील खांब परिसरात गेले अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या अष्टपैलू शिक्षिका सौ. अनुराधा अविनाश म्हात्रे यांना रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सौ. अनुराधा अविनाश म्हात्रे यांचा जन्म रोहा तालुक्यातील खांब गावचा. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणही खांबमध्येच झाले. आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक असल्यामुळे शिक्षकी पेशाचे बाळकडू त्यांना घरूनच मिळाले. समाजसेवेची आवड व अध्यात्मिक वृती यांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होत गेले. संगीताची चांगली जाण असल्यामुळे त्यांनी गायनाची आवड जोपासली. वाचनाचा छंद असल्यामुळे घराचे अक्षरशः वाचनालयात रूपांतर झाले आहे.
एवढ्या कला आणि संस्कार ज्यांचे ठायी बालपणापासूनच आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहूआयामी असणारच. सहाजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्याचे प्रतिबींब दिसून येते. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविलेला आहे. शिक्षकीपेशात प्रविष्ट झाल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी आपला प्रत्येक विद्यार्थ्यी चांगला म्हणून कसा घडेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले. यासाठी अध्यापनाबरोबरच क्रिडास्पर्धा, वकृत्व, निबंध, प्रश्नमंजूषा, हस्तकला स्पर्धा इ. त्यांनी आयोजित केल्या. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी सहभाग, श्रमसंस्कार, समाजसेवा शिबिरांमध्ये सहभाग, पर्यावरणपुरक उपक्रमांचे आयोजन, शैक्षणिक सहलींचे आयोजन इ. अनेक सहशालेय उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. M.A.B.Ed. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या आपल्या विषयाचा, गेले अनेक वर्षे SSCचा १००% निकाल देण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक नियतकालीकांमध्ये त्यांचे शैक्षणिक विषयांवरील लेखन प्रशिद्ध झाले आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कामाची आवड असल्यामुळे आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात मदतीचा हात देणे इत्यादी सामाजिक उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे,अनेक स्पर्धांमध्ये परिक्षक,अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व विविध विषयांवर व्याख्याने असा त्यांचा प्रवासही उल्लेखनीय आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची जिल्हा परिषदेने दखल घेतल्याने आपल्या कामाची पोचपावती मिळाल्याचे समाधान त्यांना आहे. परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटुन तरअनेकांनी भ्रमणध्वनी वरुन त्यांचे अभिनंदन केले आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "मला मिळालेला हा पुरस्कार फक्त माझ्या एकटीचा नसून आपल्या सर्वांचा आहे कारण आपल्या न.शि.प्र.मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) न.शि.प्र.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रजी पोटफोडे, संस्थेचे सर्व संचालक, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य, हितचिंतक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर सेवक बंधू-भगिनी यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व शुभेच्छांमुळेच मी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात यशस्वी होऊ शकले व पुरस्कारासाठी पात्र ठरले. आपल्या शुभेच्छांमुळे मला अधिक काम करण्याची उर्जा मिळाली आहे."