थकबाकीदारावर मेहेरबानी, तर रोहेकरांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर - शैलेश रावकर
रोहा नगरपालिकेचा अजब कारभार!
रोहा, दि. ११ (प्रतिनिधी) :- रोहा अष्टमी नगरपरिषदेचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एकीकडे नगरपालिकेने शहराच्या विकासाच्या नावाखाली तब्बल चार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आपल्या उरावर घेतला असताना, दुसरीकडे मात्र लाखो रुपयांची थकबाकी असणाऱ्या संस्थेला झुकते माप दिले जात असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे तालुका सरचिटणीस शैलेश रावकर यांनी केला आहे. या दुटप्पी धोरणामुळे रोहेकर नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
रोहा नगरपालिकेच्या आरक्षण क्र. १४ मधील इमारतीमधील १५ गाळे आणि २ मॉल 'फर्स्ट चॉईस हेल्थ प्रा. लि.' या संस्थेने भाड्याने घेतले आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी पालिकेने कोट्यवधींचे कर्ज काढले आहे. मात्र, ही संस्था पालिकेचे देणे देण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर आणि भाडे असे मिळून सुमारे १७ लाख रुपये या संस्थेकडून येणे बाकी आहे. असे असतानाही या थकबाकीदाराचे 'लाड' कशासाठी? असा सवाल शैलेश रावकर यांनी केला आहे. तसेच नियमानुसार, एवढी मोठी थकबाकी असताना पालिकेने संबंधित दुकानांना टाळे ठोकून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी याच थकबाकीदार संस्थेला अधिक सोयीसुविधा पुरवण्याचा चंग बांधलेला दिसून येत आहे.
याच आरक्षण क्र १४ मध्ये स्थापत्य विषयक कामांचे भूमिपूजन उद्या, रविवारी (१२ एप्रिल) मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. त्यामुळे "थकबाकीदारावर नगरपालिका इतकी मेहेरबान का?" असा टोकदार प्रश्न शैलेश रावकर यांनी उपस्थित केला आहे.
यावर मुख्याधिकारी उत्तर देणार का?
सामान्य नागरिकांच्या करातून उभ्या राहिलेल्या मालमत्तेचा असा लिलाव होताना पाहून रोहेकर संताप व्यक्त करत आहेत. थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलण्याऐवजी प्रशासन या संस्थेला रेड कार्पेट का घालत आहे? मुख्याधिकारी या थकीत संस्थेवर कारवाई करायला का कचरत आहेत? याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे कर्जाचा हप्ता आणि दुसरीकडे वसुलीचा पत्ता नाही, अशा स्थितीत रोहा नगरपालिकेची ही 'मेहेरबानी' कोणाच्या फायद्यासाठी आहे, याची चर्चा आता नाक्यानाक्यावर रंगू लागली आहे.

Comments
Post a Comment