भाले ग्रामपंचायतीकडून स्वच्छ भारत अभियान योजनेला तिलांजली, घाणीच्या साम्राज्यामुळे गावात रोगराईचा धोका!
खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे खानविलकर कुटूंबियांची गैरसोय
माणगांव (प्रतिनिधी) : माणगांव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीतील दुषित परिसर पाहता 'घाणीच्या साम्राज्याची ग्रामंंचायत म्हणजे भाले ग्रामपंचायत!' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या ग्रामपंचायतीने 'स्वच्छ भारत अभियान' योजनेला तिलांजली दिलेली असून स्वच्छतेबाबतचे शासनाचे नियम पायदळी तुडविले आहेत.
या ग्रामपंचायतीच्या हद्दीतीस प्रचंड घाणीचे साम्राज्य व दुर्गंधीयुक्त जागेमुळे येथील रामचंद्र आबासाहेब खानविलकर यांचे कुटूंब त्रस्त झालेले असून येथील अस्वच्छतेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्षच केले असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या घराच्या समोरच एक गुरांचा गोठा असून त्यातील शेण व दुर्गंधीयुक्त कचरा रामचंद्र खानविलकर यांच्या घराच्या समोरच टाकण्यात येत असल्याने येथील दुर्गंधीने हे कुटूंबिय त्रस्त झालेले असून याघाणीतील किडे घरात प्रवेश करू लागल्याने या कुटूंबियांना जगणे देखील असह्य झालेले आहे. येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मात्र बुजगावण्यासारखेच निष्क्रीय झालेले असून गावातील अस्वच्छतेकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. परिणामी भाले ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे या गावातील रामचंद्र खानविलकर यांच्या कुटूंबियांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
आठवडाभर वाजपुरवठा खंडित!
त्याचप्रमाणे विद्युतखांबावरून कोणीतरी कनेक्शन तोडल्यामुळे गेल्या आठवडाभर रामचंद्र खानविलकर यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. परंतु याबाबत महावितरण कंपनीच्या कार्यालयात वारंवार तक्रारी देऊनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही. परिणामी या गर्मीच्या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने खानविलकर कुटूंबिय त्रस्त झालेले असून याप्रकरणी या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी खानविलकर कुटूंबियांकडून करण्यात आली आहे.