ग्रामपंचायत पाटणूसच्या सरपंच निलीमा निगडे यांचे सरपंचपद रद्द 

जात पडताळणीची कागदपत्रे सादर करण्यास दिरंगाई केल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई  

उपसरपंच चंद्रकांत गुजर यांच्याकडे पदभार


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :

माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत पाटणूसच्या सरपंच निलीमा निगडे यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयात ग्रामपंचायत पाटणूसचे माजी सरपंच प्रकाश म्हामुणकर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चे मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १४ (ज)(३) नुसार विवाद अर्ज दाखल केला होता. त्या अर्जानुसार निलीमा निगडे यांना न्यायालयात योग्य ती कागद पत्र सादर करता न आल्याने त्यांच्यावर वरील कारवाई करण्यात आली. 

२४ फेब्रुवारी २०१८  रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निलीमा निगडे या लोकसहभागातून मताधिक्याने निवडून आल्या होत्या. अनुसूचित जमाती महिला सरपंच म्हणून आरक्षण असल्याने निलीमा निगडे यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरताना कुठल्याही अर्जदाराने हरकत न घेतल्याने निलीमा निगडे या निवडणुकीस पात्र ठरल्या व निवडूनही आल्या. मात्र ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाश म्हामुणकर यांनी ही बाब जिल्हा न्यायालयासमोर आणल्याने निगडे यांना न्यायालयाने जातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु निगडे यांनी न्यायालयाने दिलेल्या मुदतीमध्ये कागदपत्र सादर करण्यास दिरंगाई केली व त्यामुळे दि. १०/०८/२०२० रोजी निलीमा निगडे यांचे सरपंच पद रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. सरपंच निलीमा निगडे यांचे सरपंच पद रद्द होताच उपसरपंच चंद्रकांत गुजर यांना ग्रामपंचायत पाटणूसचा पदभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवार दि. २९/०८/२०२० रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत गुजर यांचा सत्कार करून त्यांना ही जबाबदारी दिली. 

सरपंच निलीमा निगडे यांनी सांगितले की, जातीचा दाखला मिळावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले परंतु लॉकडाऊनमुळे व अन्य तांत्रिक अडचणींमुळे आम्ही जातीचा दाखला मिळवू शकलो नाही. 

उपसरपंच चंद्रकांत गुजर यांनी सांगितले की, माझे वडिल १० वर्ष (१९८४  ते १९९४) या कालावधीत पाटणूस ग्रामपंचायत चे उप सरपंच होते. ते निवृत्त झाल्यानंतर माझ्या मुलाने देखील एकदा तरी ग्रामपंचायत पाटणूस मध्ये सरपंच किंवा उपसरपंच व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ते हयात असे पर्यंत मी त्यांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. परंतु मी आता उपसरपंच झाल्यामुळे वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याने ईश्वरराचे आभार मानत आहे.

Popular posts from this blog