महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर शर्विकाचे यशस्वी आरोहण 

अलिबागच्या कन्येने रचला इतिहास 

रोहा (रविना मालुसरे) :

१० ऑक्टोबर २०२० नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सुमारे ५१४१ फूट उंचीवर वसलेल्या साल्हेर किल्ल्यावर शर्विकाने यशस्वी चढाई केली आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान मुलगी असण्याचा विक्रम पुन्हा एकदा आपल्या नावे केला.

साल्हेर मोहीमेबद्दल अनुभव :

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोना संक्रमणाच्या भीतीने कोणत्याही किल्ल्यावर जाता येत नव्हते परंतु साल्हेर मोहीम मनातून जाण्याचे काही नाव घेत नव्हती आणि अचानक योग आला. परंतु आर्थिक अडचणी सुद्धा सोबत होत्याच. कारण साल्हेर मोहिमेला तीस ते पस्तीस हजार खर्च अपेक्षित च होता. त्यावर सुद्धा मात करून दि.०९ ऑक्टोबर २०२० रोजी सर्व तयारीनिशी मोहिमेला जायचे ठरले. नेहमीप्रमाणे आम्ही तिघे होतोच परंतू यावेळी व्हिडियोग्राफर, ड्रोन पायलट, फोटोग्राफर, ड्राइव्हर अशी सात जणांची टीम सोबत होती. साल्हेर किल्ला अलिबाग पासून सुमारे ३४३ किमी अंतरावर, परंतु ट्रॅफिक, खड्डे अशा समस्यांमुळे सुमारे बारा तासांच्या प्रवासानंतर आम्ही रात्री ठीक १० वाजता साल्हेरवाडी जवळील साल्हेर कॅम्प जवळ पोहोचलो. सुमारे बारा तासांच्या प्रवासामुळे आम्ही सर्व खूप थकलो होतो. परंतु जेव्हा कॅम्प जवळ पोहोचलो तेव्हा कॅम्पचे मुख्य संचालक उमेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम शर्विकाच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र दिसले आणि आम्ही भारावून गेलो. एवढ्या लांब सुद्धा शर्विकाचे नाव पोहोचले असेल यावर विश्वासच बसत नव्हता. तिच्यावर फुलांचा वर्षाव करून तिला एका टेबलावर बसवण्यात आले. पाच जणांनी तिचे पाय दुधाने धुवून तिचे औक्षण केले आणि तिची पूजा केली. हे पाहून आम्ही सर्व भारावून गेलो. अशा प्रकारची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा तोही एवढ्या लांब आम्ही पहिल्यांदाच अनुभवत होतो. अचानक डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या समजलेच नाही. रात्री साल्हेर कॅम्प वर जेवून मुक्काम केला,साल्हेर फोर्ट कॅम्पबद्दल काय सांगावे? इतक्या दुर्गम भागात जिथे अजून मोबाईल नेटवर्क पोहोचले नाही तिथे उमेश सर आणि त्यांच्या टीम ने असे हॉटेल उभे केले आहे की एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल अशा सोई सुविधा आणि नियोजन. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मोहिमेला सुरुवात करायची असल्याने आम्ही सर्वजणांनी लवकरच झोपण्याची तयारी केली. १० ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी सहा वाजता आम्ही सर्व जण नियोजनाप्रमाणे तयार झालो. सर्व वस्तूंची जमवाजमव करून निघालो. साल्हेर फोर्ट कॅम्पपासून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला जाण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे लागणार होती. सूर्यदेव दर्शन देण्याच्या आतच आम्ही साल्हेरच्या पायथ्याशी पोहोचलो. सुमारे एक तास शर्विका चालत होती. पण अजून तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गड देवी आणि देवतांचा आशिर्वाद घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. साल्हेरचे पठार गाठण्यासाठी सहा दरवाजे पार करावे लागणार होते. प्रत्येक द्वारावर डोके ठेऊन शर्विका हे अंतर पार करत होती, ड्रोना चार्य आणि कॅमेरा मन तिचे सर्व क्षण आपापल्या पद्धतीने टिपत होती. सुमारे दोन तासांच्या चढाईनंतर आम्ही पठारावर असलेल्या गंगासागर तलावाजवळ पोहोचलो. इथून साल्हेरचे शिखर गाठण्यासाठी दीड तास अपेक्षित होता. कारण आता बराचसा थकवा तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला होता म्हणून पंधरा मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा शिखराच्या दिशेने निघालो. शिखरावर जाण्यासाठी दोन मार्ग होते एक तलावाच्या दिशेने सरळ आणि दुसरा खिंडीमार्गे जो अतिशय अवघड समजला जातो. आम्ही खिंडीमार्गे जाण्याचे ठरवले कारण ह्यावेळी आमच्यासोबत चार जणांची टीम मदतीला होती आणि सोबत सुरक्षेचे सर्व साहित्य सुद्धा होतेच. परंतु मार्ग अतिशय कठीण जाणवू लागला. चढाई अधिकच तीव्र होत होती. घसरणीची वाट असल्यामुळे पाय जागेवर थांबतच नव्हते खूप शांतपणे आणि अतिशय आरामात आम्ही एक-एक पाऊल टाकत होतो. कारण खाली सालोटा खिंडीची खोल दरी होती. सुमारे दीड तासांचे अंतर पार करण्यासाठी आम्हाला अडीच तास लागले आणि सुखरूपपणे छत्रपतींच्या आशीर्वादाने शर्विकाने साल्हेर किल्ल्यावरील सर्वात उंच माथ्यावर श्री परशुराम मंदिरावर यशस्वी पाऊल ठेवले. एवढ्या लहान मुलीची ही चढाई शिखरावरील ट्रेकर्स आश्चर्याने पाहत राहिले आणि शर्विका जेव्हा शिखरावर पोहोचली तेव्हा सर्वांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून तिचे कौतुक केले. साल्हेर मोहीम यशस्वी पार पडल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु खिंडीतील चढाईने आम्हाला खूप थरारक अनुभव दिला होता. बोलतात ना... यश गाठण्याचे मार्ग खडतरच असतात, त्याशिवाय यशाचे मोल ठरत नाही.! गडावर गेल्यावर शर्विकाने श्री परशुराम देवाचे दर्शन घेतले. गारदच्या माध्यमातून छत्रपतींचा जयघोष केला आणि गडावरील माती कलशात घेऊन त्याची पूजा केली. हा अनुभव तिचे आईबाबा अभिमानाने सांगतात. 

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर चढाई करणारी शर्विका सर्वात लहान मुलगी ठरली. आता तिचा हा विक्रम दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. साल्हेर मोहीम यशस्वी करणाऱ्या संपूर्ण टीम, तीन वर्षाची शर्विका आणि तिचे आईबाबा यांचे मनापासून कौतूक आणि अभिनंदन करताना अभिमान वाटतो असे अ.ता.शि.प्र. खाजगी शाळा भालच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा संदीप वारगे यांनी सांगितले.

Popular posts from this blog