सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहा यांच्यातर्फे कोलाड पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन व कोरोना योद्धा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम
रोहा (रविना मालुसरे) :
रोहा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहा यांचे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून समस्त स्त्रीवर्गाचे रक्षणकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या कोलाड पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने महिला स्वयंसेवकांनी राख्या बांधून ओवाळणी केली. कोरना व निसर्ग चक्रीवादळ या काळात पोलिसांनी केलेली कामगिरी वाखाणण्यासारखी म्हणावी लागेल. पोलिसांचे आपल्या प्रति असलेले ऋण लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ड्युटीवर असलेल्या पोलिस बांधवांसाठी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरा करण्याचा सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या युवतींचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
त्याचप्रमाणे कोरोना काळात आपल्या प्राणाची बाजी लावून महामार्ग नियंत्रण कक्ष व जनतेचे प्रश्न यांच्याशी एकनिष्ठ राहून कर्तव्य बजावणाऱ्या कोलाड पोलीस कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत तायडे, पोलीस कॉन्स्टेबल वाय. ए. तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. डि. ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. कांबळे, एस. ए. विघ्ने, पोलीस कॉन्स्टेबल एस. एम. लंजारे, पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. चौरे, पोलीस कॉन्स्टेबल एम. के. तावडे यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने खजिनदार किरण कानडे, मयूर धनावडे, विनीत वाकडे, सौरभ भगत, परेश चितळकर, प्रसाद पाटूकले, राहुल पोकळे, आरती देशमुख, प्रिया जंगम,ममता शिंदे, विशाखा पाटील, दिपाली कानडे, रश्मी देशमुख, अक्षता चौलकर, रिया कासार इत्यादी स्वयंसेवक उपस्थित होते.