तांबडी रोहा प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार, पिडीतेला न्याय देण्यास शासन कटिबद्ध.!
गृहमंत्री अनिल देशमुख यांची ग्वाही
रोहा (रविना मालुसरे) :
रोहा तालुक्यातील तांबडी येथील प्रकरणाचा खटला सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्वल निकम यांच्यामार्फत फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रोहा येथे दिली. यासाठी आवश्यक ती सर्व चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे सादर करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
तांबडी, तालुका रोहा येथील पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे सदर कुटूंबियांच्या घरी आले असताना बोलत होते.
यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव आदी उपस्थित होते.
रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीसांनी केलेला तपास हा योग्य दिशेने होता. खुद्द न्यायालयानेही याबाबीची दखल घेतली आहे. एक कार्यक्षम पोलीस दल म्हणून लौकीक मिळविलेले महाराष्ट्र पोलीस हे देशात अव्वल दर्जाचे आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. याबाबतीत कोणीही शंका उपस्थित करु नयेत असे प्रतिपादन करुन त्यांनी सुशांत सिंग आत्महत्येच्या तपासावरुन चाललेल्या राजकारणाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.