उरणच्या प्रवेशद्वारात खड्डेच खड्डे, सिडको अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, वाहनचालकांची दमछाक
उरण (प्रियंका म्हात्रे) :
उरण तालुक्याच्या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. उरण शहराची वाटचाल विकासाकडे होत असताना उरणच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यांच स्थिती अतिशय वाईट झाली आहे. मात्र याकडे सिडको अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या खड्ड्यांमुळे रात्री अपरात्री ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील कार्यालयाच्या माध्यमातून मागील वर्षी बोकडविरा चार फाटा ते उरण शहर प्रवेशद्वार (कोट नाका) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करोडो रुपये खर्च करून करण्यात आले. परंतु पावसाळ्यात उरण शहर प्रवेशद्वार (कोट नाका) या ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने उरण शहरात ये - जा करणाऱया वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. तसेच सदर रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहतूक कोंडीची समस्यां उदभवत आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिने झाले तरी सिडकोने आपल्या ताब्यात घेतलेल्या सदर रस्त्यावरील खड्डयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही. यामुळे जनतेत, प्रवासी वर्गात सध्या सिडको विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.