गणपतीला गावी येणाऱ्यांना 7 दिवस कॉरंटाईन व्हावे लागेल : वरचीवाडी ग्रामस्थांचा निर्णय
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगाव तालुक्यातील वरचीवाडी (विळे) ग्रामस्थांनी पहिल्या लॉकडाऊनपासून कडक धोरण राबवून प्रशासनाला मदत केल्याने विळे परिसर आता पर्यंत कोरोनामुक्त राहिला आहे. याचे सारे श्रेय वरची वाडी ग्रामपंचायतीचे सरपंच परशुराम कोदे, ग्रामसेवक श्री. साळवी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, व्यापारी वर्ग आणि वरचीवाडी ग्रामस्थ यांना जाते. गरज भासेल तेंव्हा दुकानें बंद ठेवणे, गाव बंदी करणे आणि बाहेरून येणाऱ्यांना कॉरंटाईन करणे व अनोळखी माणसाची सखोल चौकशी करणे. या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने विळे परिसर कोरोना मुक्त राहिला आहे. विळे परिसरात गणपतीला शहरवासी आले तर कोरोनाची बाधा होऊ शकते. हा धोका लक्षात घेऊन वरचीवाडी ग्रामस्थांनी शासनाच्या निर्णयाचा आदर करून जे चाकरमानी गावी येतील त्यांना किमान 7 दिवस होम कॉरंटाईन व्हावे लागेल असा एकमुखी निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर वरचीवाडी सरपंच व सर्व ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. यामध्ये स्वतः सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता.