रोहा तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांत भ्रष्टाचार, काम न करताच काढली कामांची बिले!
रायगड (भिवा पवार) :
रोहा तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी तसेच लाखोंची उलाढाल असलेल्या ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील तामसोली गावात विकासकामांच्या नावावर काम न करताच बिले लाटण्यात ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार उघड झाला असून येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कामाचा ठराव एक आणि मंजूर केलेले काम दुसरेच, बिलं मात्र काम न करताच लाटल्याचे समोर आले आहे.
तामसोली ग्रामस्थांच्या मागणीनुसार सन 2019/20 या वर्षात ग्रामपंचायतीच्या जनरल फंडातून राजिप शाळा ते काशिनाथ चव्हाण या रस्त्याचे फिव्हर ब्लॉकचे काम करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करून दोन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र ते काम न करता दुसऱ्याच कामाची मंजुरी घेऊन कामाची वर्क ऑर्डर तयार केली आणि ते काम ग्रामपंचायतीच्या चौदा वित्त आयोगातून करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र एकाच कामांची दोन बिलं लाटली असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
याविषयी संबधित अधिकारी वर्गाने चौकशी करून शाळेकडे जाणार रस्ता करण्याचे आदेश संबधित ठेकेदाराला देण्यात यावे अशी माहिती माजी उपरपंच व सामाजिक कार्यकर्ते यशवंत हळदे, गावचे अध्यक्ष उमाजी चव्हाण व ग्रामस्थ महिलांनी केली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून संबधित अधिकारी काय कारवाई करतील याकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागून राहिलेले आहे.