३३ वर्षे अविरत वैद्यकीय सेवा देणारे विळे येथील डॉक्टर नितीन मोदी कोविड योद्धा म्हणून सन्मानित 


पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील विळे येथील डॉक्टर नितिन मोदी यांनी विळे येथे दवाखाना सुरू करून ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत खासदार सुनिलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (कोविड-१९) कोविड योद्धा म्हणून त्यांना सन्मान पत्र देऊन नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे माणगाव तालुका पत्रकार संघ यांनी देखील डॉ. मोदी यांच्या कार्याची दखल घेत (कोविड-१९)कोविड योद्धा म्हणून मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेतली.


कोरोना महामारीच्या जागतिक संकटसमयी लॉकडाऊनच्या काळात सर्वजण आपापल्या घरात शासनाला सहकार्य करण्यासाठी थांबलेली असताना कोविडशी सामना करण्यासाठी स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालून डॉ. मोदी यांनी वैद्यकीय सेवा करून मदत केली व रात्रंदिवस समाजाची सेवा करून कर्तव्य बजावले. तसेच सामाजिक जाणिवेतून कोरोनाचा मुकाबला करीत समाजाला सहकार्य केले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करून त्यांना वरील दोन पुरस्कार प्रदान करण्यात आले. निजामपूर परिसर व विळे पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पैशासाठी वाटेल ते करणारे डॉक्टर आपण नेहमी पाहतो. किंवा दैनिकात वाचतो परंतु काही डॉक्टर याला अपवाद असतात. डॉ. मोदी देखील त्यातीलच एक आहेत. डॉक्टरसारखी पदवी घेऊन विळे सारख्या परिसरात येऊन डॉ. मोदी यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. तो काळ फार अवघड होता. ३३ वर्षांपूर्वी विळे परिसरातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तरीही वडिलांच्या आग्रहाखातर गरिबांची सेवा करायची हा उदात्त हेतू नजरे समोर ठेऊन डॉ. मोदी यांनी विळे परिसरात वैद्यकीय सेवा सुरू केली. डॉक्टर पदवी घेऊन शहरात जाण्यापेक्षा गावात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. मोदी यांनी गावातील रुग्णांसाठी अनेक वेळा रक्तदान केले, आजही करतात. डॉ. नितिन मोदी हे निजामपूर भागातील स्वातंत्र्य सैनिक धनजी भाई मोदी यांचे चिरंजीव असून आपल्या वडिलांचा वारसा जपत ते वाटचाल करीत आहेत. वडिलांनी देशसेवा केली तर डॉ. मोदी गेली ३३ वर्षे जनतेची अल्प दरात सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची चिन्ता न करता अडचणीच्या वेळी गावा गावात जाऊन ते रुग्ण सेवा करीत असत. आता त्यांच्या कडे चार चाकी वाहन आहे मात्र पूर्वी त्यांच्या कडे वाहन नव्हते तरीही त्यांच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. बहुतेक वेळा रुग्णाचे नातेवाईक शहरात नोकरी निमित्त गेलेले असतात किंवा एखाद्या रुग्णाकडे पैसे नसतील तर ते रुग्णांची परिस्तिथी पाहून स्वतः रुग्णांसाठी पैसे खर्च करतात व उपचार करतात. रुग्णाचे नातेवाईक गावी आल्यानंतर त्यांनी रुग्णाच्या फीचे पैसे दिले तर ठीक नाहीतर ते स्वतः रुग्णाच्या नातेवाईकाकडे फीच्या पैशांची मागणी करीत नाहीत. 

डॉ. मोदी यांचे शिक्षण बेळगांव व पुणे येथे झाले. ते डॉक्टरकीच्या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. कार्यतत्परता, सूक्ष्म निरीक्षण वृत्ती, सुनियोजन व उपक्रम शील संघटक  म्हणून ते ओळखले जातात. परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विळे परिसरातील काही मान्यवर यांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हि म.मेथा विद्यालयाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सध्या ते हि. म. मेथा विद्यालयाच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. तसेच भैरवनाथ ज्ञान प्रसारक मंडळावर सदस्य आहेत.

Popular posts from this blog