विळे बाजारपेठेत लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मेडिकल व दुग्ध व्यवसायाव्यतिरीक्त सर्वच दुकाने बंद
पहिल्या दिवसापासूनच बाजारपेठ पडली ओस
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) :
माणगांव तालुक्यातील विळे बाजारपेठेत खरेदीसाठी पाटणूस पंचक्रोशी, सणसवाडी, बेडगाव, तासगाव, भागाड, साजे, रवाळजे व आजूबाजूच्या परिसरातून मोठया संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे विळे बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. परंतु वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवस रायगड जिल्हा लॉगडाऊन झाल्याने विळे बाजारपेठ पुन्हा ओस पडली आहे.
15 जुलैला ग्राहकांनी नियोजनबद्ध पद्धतीने 10 दिवस पुरेल इतके जीवनावश्यक सामान खरेदी करून करून लॉकडाऊनची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच विळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. केवळ मेडिकल आणि दुग्ध व्यवसायिकांचीच दुकानें फक्त मर्यादित वेळेपुरती सुरू होती. तरीही ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तूंचा अगोदरच साठा करून ठेवला असल्याने बाजारात कुणीही फारसे फिरकले नाही. त्यामुळे या परिसरात लॉकडाऊन 100 % यशस्वी होईल असे चित्र पहिल्या दिवसापासून दिसत आहे.