वीज ग्राहकांचे तीन महिन्याचे बिल माफ करावे अन्यथा वीजबिलांची होळी.!
भाजप तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांचा इशारा
माणगांव (प्रतिनिधी) : गेल्या तीन महिन्यांपासून आलेले कोरोना नावाचे भयानक संकट व त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा यामुळे गोरगरीब सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असून कामधंदा नसल्याने हातात पैसा नाही अशा परिस्थितीत तीन महिन्याचे अव्वाच्या सव्वा वीजबिल आल्याने वीज बिले कुठून भरणार? असा सवाल जनतेसमोर उभा राहिलेला आहे. राज्य शासनाने याकडे लक्ष देवून महावितरण कंपनी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करून संकटात असलेल्या नागरिकांचे एप्रिल ते जून हे तीन महिन्यांची वीज बिले माफ करावीत अन्यथा याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन आंदोलन करून वीजबिलांची होळी करण्यात येईल व कोणीही वीजबिल भरणार नाही असा इशारा माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांनी दिला आहे.
ग्राहकांना एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांची एकत्र बिले आली आहेत. ही बिले भरमसाठ आल्याच्या तक्रारी माणगाव तालुक्यातील वीज ग्राहकांनी आपल्याकडे केल्या आहेत. कोरोनाचे तीन महिन्यांपासून असणारे संकट व जूनमध्ये झालेले निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सर्वांनाच बसला आहे. माणगाव तालुक्यात चक्री वादळाचा अनेकांना फटका बसला आहे. गरीब, सामान्य जनतेच्या घरांची झालेली पडझड हे लोक अजून पैशाअभावी घर ठिकठाक करू शकलेले नाहीत. राज्य शासनाकडून माणगाव तालुक्यात अद्यापपर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आर्थिक परिस्थिती अनेकांची हालाखीची झाली आहे. त्यातच हे तीन महिन्याचे एकदम वीजबिल ग्राहकांच्या हाती आलेले आहे.