महिला पोलीसाने घडविले माणुसकीचे दर्शन
रायगड (किशोर केणी) :
रायगड जिल्हामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये दिनांक ३ जून रोजी चक्रीवादळ होण्याचे संकेत दिले होते. रायगड जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाणे हे सागरी किनारी असल्याने सदर ठिकाणी चक्रीवादळामुळे मालमत्तेचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता होती. त्या अनुषंगाने या सागरी पोलीस ठाण्यांना जादा कुमक दिली गेली होती. त्यानुसार बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर बंदोबस्ताकरिता रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस नाईक/109 आरती मंदार राऊत यांना श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे नेमण्यात आले होते. दि. ४ जून रोजी महिला पोलीस नाईक आरती राऊत ह्या त्यांचे पती मंदार राऊत यांच्यासोबत त्यांच्या खाजगी वाहनाने तळा मार्गे श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे बंदोबस्ताकरिता जात होत्या त्या तळा येथील वाशी या गावात आल्यानंतर काही महिला रस्त्याचे बाजूला उभ्या असलेल्या दिसून आल्या. महिला पोलीस नाईक आरती राऊत यांनी स्वतःचे खाजगी वाहन थांबवून त्या महिलांकडे चौकशी केली असता त्यापैकी एका महिला गर्भवती असल्याचे व तिला बाळंतपणाच्या कळा चालू असल्याची माहिती म.पो.ना./109 राऊत यांना समजली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या महिलेस रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता त्या गावातून कोणतेही वाहन उपलब्ध होत नसल्याचे तेथील महिलांनी सांगितले. सदर महिलेस रुग्णालयात तत्काळ पोहचविणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. म.पो.ना. राऊत यांनी क्षणाचाही विलंब न लावता गर्भवती महिला व त्यांचे दोन नातेवाईक यांना स्वतःच्या खाजगी वाहनात बसवून म्हसळा दिशेने गेले. म्हसळा येथे जात असताना रस्त्यामध्ये असलेले अडथळे दूर करीत त्या स्वतःचे वाहन म्हसळा येथे घेऊन गेल्या त्या ठिकाणी सदर गर्भवती महिलेस रुग्णालयात दाखल केले व गर्भवती महिलेस वेळीच उपचार मिळाला. सदर गर्भवती महिलेस वेळीच उपचार मिळाल्यामुळे ती गर्भवती महिला व तिचे बाळ सुरक्षित राहिले.