निसर्ग चक्रीवादळामुळे मालसई गावामध्ये अपरिमित हानी

प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज




रोहा (रविना मालुसरे) :
निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण परिसराला प्रचंड हादरा बसलेला असतानाच रोहा तालुक्यातील मालसई गावामध्ये अपरिमित हानी झाली आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गावातील 110 घरांपैकी जवळपास 100 हून अधिक घरांना तडाखा बसला आहे.गावांतील जवळपास सर्वच घरांवरील पत्रे व कौले उडाली आहेत. गाव परिसरातील व शेतांवरील लहान-मोठे वृक्ष वाऱ्याच्या प्रचंड झोतापुढे टिकू शकले नाहीत. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. गावातील काही नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.


आधीच कोरोना पार्श्वभूमीवर  व लॉकडाऊनमुळे गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध नव्हता .अशातच कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट गावांमध्ये सापडल्यामुळे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. गावातील नागरिकांना गावाबाहेर पडण्यास मागील दहा दिवसांपासून मनाई करण्यात आली होती. त्यामुळे गावातील नागरिकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतानाच निसर्ग चक्रीवादळाने गावावर घाला घालून केलेल्या हानीमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे शासनस्तरावर केवळ पंचनामे करून मदतीची प्रतीक्षा करण्यापेक्षा सुमारे पाचशे नागरिकांना शासनाने दत्तक घेऊन तात्काळ अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे .

दरम्यान, अनेक नागरिकांच्या डोक्यावरील छप्पर हरवल्यामुळे बेघर झालेल्या कुटुंबियांचे तात्पुरते पुनर्वसन ग्रामस्थांच्या मदतीने गावातील मंदिरांमध्ये करण्यात आले आहे अशी माहिती उपसरपंच सुनील मोहिते यांनी दिली.

Popular posts from this blog