साळाव कुंडलिका खाडीत बुडणार्या व्यक्तीला रेवदंडा पोलीसांनी वाचविले
रायगड (किशोर केणी) :
साळाव येथील कुंडलिका खाडीत बुडणार्या ३२ वर्षीय व्यक्तीला मच्छिमांराच्या मदतीने वाचविण्यात रेवदंडा पोलीसांना यश आले आहे.
११ जून रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धर्मेंद्र म्हात्रे यांना त्यांच्या मोबाईलवर रिक्षा चालक संजय कांबळी (रा.साळाव, ता. मुरुड) यांना संपर्क केला आणि साळाव पुलावरुन खाडीच्या पाण्यात एकाने उडी मारली असून तो बुडत आहे, अशी खबर दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, सहाय्यक फौजदार सुनील माळी, पोलीस हवालदार श्रीकांत म्हात्रे, प्रमोद देसाई, सुभाष जाधव, पोलीस नाईक सुशांत भोईर, धर्मेंद्र म्हात्रे, पोलीस शिपाई पंजाब पोळे, तुलजीराम मल्लाव, होमगार्ड राजू लोभी हे तत्काळ साळाव पुलाकडे रवाना झाले. तेथे पोहोचल्यानंतर खाडीच्या पाण्यात एकजण बुडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पुलावर उभ्या असलेल्या पाण्याची वाहतूक करणार्या रिक्षामध्ये असलेले रिकामे ६ प्लॅस्टीकचे ड्रम बुडणार्या व्यक्तीच्या दिशेने पाण्यात फेकले. तसेच पाण्यात फेकलेले ड्रम जवळ घेण्याबाबत वेळोवेळी आवाज देऊन त्यास धीर दिला. घटनास्थळापासून साळाव ब्रिजच्या पलिकडे सुमारे १५० मीटर अंतरावर रेवदंडा रेतीबंदर येथील एका बोटीवरील मच्छिमाराला तात्काळ बुडणार्या व्यक्तीच्या दिशेने येण्याबाबत आवाज दिला.
रेवदंडा रेतीबंदरजवळील बोट तसेच घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेवदंडा जेट्टीवर उभ्या असलेल्या आणखी एका बोटीवरील मच्छिमारांनाही मदतीसाठी हाक दिली असता, त्यांनी त्यांची इंजिन असलेली बोट बुडणार्या व्यक्तीच्या दिशेने नेली. दोन्ही बोटीवरील मच्छिमारांनी या बुडणार्या व्यक्तीला हात देऊन, त्याला बोटीत घेतले आणि त्याचे प्राण वाचविले.
पाण्यात बुडण्यापासून वाचविण्यात आलेल्या या ३२ वर्षीय व्यक्तीला सदर दोन बोटींच्या मदतीने रेवदंडा जेट्टी येथे सुखरुपरित्या जेट्टीवर उतरविण्यात आले. त्याला धीर देऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले. तेथे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधला. त्यांना बोलावून घेतले आणि या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.