मुरुड नगरपरिषद भु माफियाच्या की शिवसेनेच्या हातात?
माजी नगराध्यक्ष करतोय बेकायदेशीर मनमानी...!
मुरुड-जंजिरा (वार्ताहर) : मुरुड-जंजिरा नगरपरिषद निवडणुका शिवसेनेने सर्वपक्षा विरोधात लढून जिंकली होती. पण सध्या आंधळे दळतेय आणि कुत्रे पीठ खातेय अशी अवस्था आहे.
कारण सध्या बेकायदेशीर बांधकाम करण्याबाबत गुन्हा दाखल झालेला आरोपी रहिम कबले कुणाचे असेसमेंट कुणाला द्यावे ? कोणता सातबारा कुठे जोडून कुठे काम करावे ? असे निर्णय सर्वांना फाट्यावर मारुन घेत आहे. त्यामुळे प्रामाणिक शिवसैनिक व सर्वसामान्य जनता हेची काय फळ मम तपाला ? असे म्हणून नाराजीचे सुर आळवत आहे. विद्यमान नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या पराभवासाठी जंगजंग पछाडलेला पुर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा माजी नगराध्यक्ष नेहमीच आपल्या कुकर्मांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. पण तो स्वतः व त्याची पत्नी पराभूत झाल्यानंतर लगेचच त्याने शिवसेनेच्या गळी पडून स्वीकृत सदस्य म्हणून पद मिळविले. आता या जमिनीच्या विविध अवैध प्रकरण कार्यात कुप्रसिद्ध असलेल्या भुमाफियाने स्वतःचे गैरधंदे पुन्हां सुरु केले आहेत.
२०१२ साली ज्या जागेवर अवैध बांधकाम केले, त्याप्रकरणी नुकताच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याच जागे जवळ बेघर गरीब लोकांसाठी दिलेल्या जागांवर आता त्याने सरकारी जागा ज्यांची घरे आहेत त्यांना मिळवुन देण्याचा वेगळा धंदा सुरु केला आहे. या गैरप्रकाराची तक्रार नगर परिषद प्रशासनाकडे नेल्यावर तक्रारदाराला मार्गी लावले जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आहे की भुमाफियाची ? असा प्रश्न सर्वांना पडू लागला आहे. अशा प्रकरणातील एक घटनेमधे अलकापुरी परिसरातील अल्पसंख्यांक समाजाला दिलेल्या जागेवर घर असुन एका अनाथ मुलासाठी आजीने राखलेल्या जागेवर असेच अवैध काम सुरू केले आहे.
हे प्रकरण राष्ट्रवादी कोंग्रेस अल्पसंख्यांक समाजाचे नेते सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक आतिक खतीब यांच्याकडे गेले आहे. कारण आतिक खतिब उप-नगराध्यक्ष असतानाच कै. संतोष तवसाळकर यांच्या कारकिर्दीत सदर सरकारी जागांचे वाटप बेघर लोकांसाठी दिले गेले होते. याठिकाणी दिवंगत शरिफा अ. रज्जाक सुबेदार यांना एक छोटीशी जागा देण्यात आली होती. त्यांचे दिवंगत पुत्र जलाल सुबेदार यांच्या कु. तौफीक नावाच्या अनाथ मुलासाठी म्हणजेच नातवासाठी त्यांनी स्वतःच्या खर्चाने जागेवर १८,००० रुपये खर्च करुन दगडी पायाचे बांधकाम करून घेतले होते. तौफीक वयाने लहान होता. त्यामुळे त्याच्या दोन्ही काकांनी भविष्यात तोच घर बांधून त्या ठिकाणी राहील असे ठरवले होते. याची माहिती सर्व समाज बांधवांसह सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता अनपेक्षीतरित्या या जागेवर शिवसेनेत शिरलेला रहिम कबले हा भुमाफीया लबाड कोल्हा बनून शिरला आहे. ज्यांचे अगोदर पासून तिथेच घर आहे. अशांना या अनाथ मुलासाठी आजीने ठेवलेल्या जागेवर अवैधरित्या घर बांधकाम करुन जागा हडपण्यास आता याने पुढाकार घेऊन नवे वाद सुरु केले आहेत. या भुमाफियाने नगर परिषदेत अशाच अवैध कामांसाठी प्रवेश केल्याचे सर्वत्र स्पष्ट होते आहे.
सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यास हे प्रकरण पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांच्यापर्यंत नेण्याचा निर्णय बेघर तौफीक याच्या नातेवाईकानी घेतला आहे.