सक्रीय, ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार किरण बाथम यांची विधानपरिषदेवर नियुक्ती व्हावी अशी पत्रकारांची अपेक्षा
रोहा (समीर बामुगडे) : १९८७ पासून रायगडसह पनवेल व नवी मुंबई भागांतुन धाडसी पत्रकारिता करून सर्वांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या जेष्ठ पत्रकार किरण बाथम यांची विधान परिषदेवर नियुक्ती व्हावी अशी अपेक्षा बहुतांश पत्रकारांनी "रोहा टाईम्स" कडे व्यक्त केली आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ किरण बाथम हे पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. १९८७ पासून त्यांनी अगदी युवावस्थेपासून सुरुवातीला दै. कृषीवल नंतरच्या लोकसत्ता, सामना, मुंबई-सकाळ, पुण्य नगरी, नवाकाळ अशा अनेक आघाडीच्या वृत्तपत्रामधून त्यांनी निर्भीड व सकारात्मक पत्रकारिता केली. चित्रलेखा या सर्वाधिक खपाच्या मैगझीनचे ते अनेक वर्षे कोकण विभागीय प्रतिनिधी होते. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात कै. प्रभाकर पाटील, माधवराव मंडलीक, कै.दिलीप राजे, नवीनचंद्र सोष्टे आदींसह अनेक वर्षे त्यांनी कार्य केले. रायगड जिल्हा प्रेस क्लब निर्मितीपासून जिल्हाभर विस्तार असो... मुंबई-गोवा हायवे आंदोलन असो... किरण बाथम यांनी जिल्हा सरचिटणीस पासून जिल्हाध्यक्ष म्हणून धाडसी कार्य केले. इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये पत्रकारितेची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी सहारा समय, आजतक या हिंदी तसेच आयबीएन, जय महाराष्ट्र, साम टीव्ही अशा नामवंत मराठी टीव्ही चैनलसाठी त्यांनी धडाकेबाज पत्रकारिता केली.
सध्या ते रजत शर्मा यांच्या इंडिया टीव्ही चैनलचे रायगड जिल्हा प्रतिनिधी आहेत. दै.शिवतेजचे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून तसेच ते विविध वृत्तपत्रांमधून लेखन करत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई , नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (एन.यु.जे.) प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र अशा पत्रकार संघटनामधून ते सतत कार्यरत आहेत.
३० वर्षापेक्षा अधिक काळात त्यांनी रायगडसह पनवेल, नवी मुंबईमध्ये काम केल्याने त्यांचा कोकणसह सर्व ठिकाणच्या पत्रकारांशी खुप जवळचे संबंध व आदराचे स्थान आहे. त्यामुळे किरण बाथम यांच्यासारखा अभ्यासू, निर्भिड, मिलनसार पत्रकार विधान परिषदेवर गेला तर पत्रकारांच्या समस्या जाणणारा अनुभवी प्रतिनिधी पत्रकार मंडळीना मिळेल असे बहुसंख्य पत्रकारांचे म्हणणे आहे.