कोरोना संकटात लोणेरे परिसरातील ग्रामपंचायतींना पाण्याची टंचाई
लोणेरे (प्रतिनिधी) :
या रखतखत्या मे महिन्यात पन्हळघर ते लोणेरे अशी वाहणारी हंगामी नदी आटल्याने लोणेरे ग्रामपंचायत व परिसरातील इतरही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
सदर नदी किनारी परिसरातील अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. व या विहिरींवरच या गावांच्या नळपाणी पुरवठा योजना अवलंबित आहेत. त्यापैकी लोणेरे ग्रामपंचायत, न्हावे, अंबर्ले, पहेल, पन्हळघर बुद्रुक, मागंरूळ या ग्रामपंचायतींच्या विहिरीतील पाणी पातळी खालावल्याने नळपाणी पुरवठा योग्य होत नाही. तथापि सदर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक पाण्यासाठी गावातील विहीर व पाणवठ्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी करून सोशल डिस्टन्स न ठेवता करोना प्रादुर्भावाला आयते निमंत्रण देत आहेत.
सदर नदीपात्रातील पाण्याची पातळी खाली गेल्याने नदीपात्रातील खड्डयांत जे पाणी साचून राहिलं आहे, त्यामध्ये काही लोक मासेमारी करून पाणी गढूळ व दुषित करत आहेत. असे हे दुषित पाणी आरोग्यास हानिकारक आहे. अशा मासेमारी करणाऱ्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी सर्व ग्रामपंचायतीतील नागरिकांनी केली आहे.
पन्हळघर येथील धरणातील उपलब्ध पाण्यातून या नदीला पाणी विसर्ग करून नदी प्रवाहीत केली तर पाण्याची पातळी वाढून नदीलगत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचीही पाणीपातळी वाढून प्रत्येक गावाला मुबलक पाणी मिळू शकेल. परंतु हे पाणी नदीला सोडत नसल्यामुळे गावागावांतील ग्रामस्थ धरण-जलाशय परिचालन नियोजन व्यवस्थापन समितीला दोष देत आहेत. सदर समितीकडे संपर्क साधला असता नदीलगत पाणी पुरवठा योजनेच्या असलेल्या विहिरीसंदर्भातील ग्रामपंचायतीने पाण्याच्या मागणीचे अधिकृत लेखी विनंती अर्ज सादर करताच तात्काळ पाणी सोडण्यात येईल असे समितीने सांगितले आहे.