आमदार प्रशांत ठाकूर यांचा टॅक्सी चालकांना मदतीचा हात
खोपोली (राजू भंडारी) :
संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोनाची रूग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव ही ठिकाणं जणू कोरोनाची माहेरघरच होत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. या सर्वच ठिकाणी रूग्णांची संख्या सतत वाढताना दिसत असल्यामुळे शासन लाॅकडाऊन वाढवण्याच्या तयारीत आहे. लाॅकडाऊनचा फटका महाराष्ट्रातील इतर सामान्य जणतेप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या 12 हजार विक्रम, मिनिडोअर, ईको टॅक्सी चालक-मालकांना सध्या बसला आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वच ठिकाणी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे व उदरनिर्वाहाचे इतर कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने या सर्व टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशातच पनवेलमधील वंदेमारम जनरल कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या पनवेल-फॅक्टरी विभागातील 110 सहा आसनी ईको टॅक्सी चालकांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली वंदेमातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवि नाईक, तसेच नगरसेवक संतोष भोईर, यांनी गरजू टॅक्सी चालक मालकांना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला.
यावेळी फॅक्टरी लाईनचे अध्यक्ष बाबूराव शेळके, उपाध्यक्ष श्याम भगत, रायगड जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी तथा मार्गदर्शक शंकर पाटील उपस्थित होते.