प्रशासनाच्या दमदार कामगिरीमुळे रोहा तालुका कोरोनापासून सुरक्षित
रोहा (समीर बामुगडे) :
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखताना रोहा शहर व ग्रामीण भाग कोरोनामुक्त ठेवण्यासाठी महसुल, नगरपालिका आणि पोलीसांबरोबरच आरोग्य आणि ग्रामीण विभाग पंचायत समिती विभागानेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे रोहा तालुका हा भाग कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल ग्रामीण भागातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जिह्यातील रोहा ही एक मोठी बाजारपेठ असून ९० ते १२० गावाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य विभाग, पोलीस, नगरपालिका आणि पंचायत समिती यांनी या भागाकडे विशेष लक्ष देऊन महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. ग्रामीण रुग्णालयात येणारे रुग्ण यांची वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी काळजी घेतली. मुंबई व अन्य शहरातून रोहा शहरात येणाऱ्यांचे सर्वेक्षण करणे, त्यांना कॉरन्टाइन करणे, त्यांची नियमित तपासणी करणे याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करुन चांगले काम केले. रोहा पोलीस दुरक्षेत्र येथील पोलीस अधिकारी व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी २४ तास जागता पहारा ठेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची कामगिरी बजावली आहे.