लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील नागरिक विविध कामात व्यस्त
वेळेचा करीत आहेत सदुपयोग
रोहा (समीर बामुगडे) :
कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने या फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व पगारदार वर्ग विविध कामात व्यस्त असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र लॉकडाऊन पुकारल्याने व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना या कालावधीत सुट दिली असल्याने बहुतांश व्यवहार हे जवळ-जवळ ठप्पच झाले आहेत. अशा वेळी आपल्या फावल्या वेळेचे करायचे हा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला असतानाच ग्रामीण भागातील शेतकरी व अन्य नागरिकांनी शेतीच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करायचा याबाबत नियोजन करुन कामाची आखणी केली आहे. त्या अनुषंगाने कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती लक्षात घेता अति महत्त्वाचे कामाव्यतिरिक्त सहसा कोणीही बाहेर पडताना दिसत नाही. अशावेळी ग्रामीण भागातील पुरुष व महिला आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. महिलावर्ग तांदूळ, पोहे व उडदाचे पापड करणे, तांदळ व साबुदाण्याच्या फेण्या, तांदळाच्या शेवया, कडधान्ये सुकविणे आदी कामात तर शेतकरी व अन्य नोकरदारवर्ग शेतीची बांधबंदीस्ती, घरांचे बांधकाम व दुरुस्ती तसेच जंगल भागातून सरपण गोळा करणे आदी व्यस्त आहेत. ही सर्व कामे करताना सुरक्षितता म्हणून बाहेरील माणसे मदतीला घेतली तर सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करताना दिसत आहेत. तर या सर्व कामात घरातील लहान मुले मुली व वयोवृद्ध मंडळींचे सहकार्य लाभत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच शासनानेही जमावबंदी आदेश लागू करून सर्वच व्यवहारावर कडक नियमावली तयार केली आहे. तर देशवासीय देखील कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या परीने शासनाला सहकार्य करीत आहेत.
