सणसवाडी येथे पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने विळे परिसरात खळबळ
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील सणसवाडी येथे पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने विळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सणसवाडी येथील रहिवाशी असलेले ३२ वर्षीय इसम नेहरूनगर विलेपार्ले येथे राहतात. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून त्यांनी गावी यायचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे ते आपल्या कुटुंबियांसोबत गावी आले. ते गावी आल्याचे समजताच सणसवाडीत ग्रामकमिटीने त्यांना होम कॉरन्टाईन करून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला टेंप्रेचर चेकअपसाठी शिरवलीच्या आरोग्य केंद्रात पाठविले. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे टेंप्रेचर नॉर्मल होते. परंतु सदरील ३२ वर्षीय इसमाचे टेंप्रेचर हाय वाटल्याने त्यांची तीन वेळा तपासणी करण्यात आली. मात्र तरीही टेंप्रेचर हाय आल्याने त्यांना १०८ नं. च्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रूग्णालय माणगांव येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्या सर्व टेस्ट घेण्यात आल्या असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे आढळले.
विळे परिसरात पहिल्यांदाच पॉझिटीव्ह रूग्ण वाढल्याने परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. विळे परिसरात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून वरचीवाडी सरपंच परशुराम कोदे, विळे सरपंच गजानन मोहिते, सणसवाडी सरपंच सुनीता नलावडे व या परिसरात पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशासेविका, कोरोना नियंत्रण कमिटीचे सर्व सदस्य यांनी वारंवार नागरिकांमध्ये जनजागृती केली. दुकानांमध्ये गर्दी होऊ नये याची काळजी घेतली. प्रसंगी तीन-तीन दिवस मार्केट बंद ठेवली. त्यानंतर आठवड्याचे रविवार व बुधवार असे दोनच वार मार्केट सुरू ठेवले व त्यामुळेच आतापर्यंत विळे परिसरात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नव्हता. परंतु मुंबईतून आलेल्या नागरिकांमुळे या परिसरात पहिल्यांदाच पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्याने या परिसरातील नागरिकांनी आता तरी जागरूक राहणे फार गरजेचे आहे.