वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पडलेय आजारी..!
डॉक्टर व रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर बेपत्ता, डॉक्टरांचे कॉटेज पडलेत ओसाड, रूग्णांची प्रचंड गैरसोय
रायगड (किशोर केणी) :
पेण तालुक्यातील वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने डॉक्टरांसाठी बंधण्यात आलेले कॉटेज ओसाड पडलेले दिसत आहेत. या परिसरात रूग्णांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. तसेच येथील रूग्णवाहिका देखील धूळ खात पडलेली आहे.
या परिसरात दुषित पाण्यामुळे होणारे आजार तसेच कुत्रा, साप चावण्याच्या घटना वारंवार घडत असतात. परंतु याठिकाणी असलेली रूग्णवाहिका ही फक्त दिखाव्यासाठीच असून ती धूळ खात पडलेली आहे. अशा परिस्थितीत जर रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जायचे झाल्यास खासगी वाहनाने जावे लागते. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे खाजगी वाहनांना देखील रस्त्यावर फिरण्यास बंदी असल्यामुळे येथील गैरसोय ही रूग्णांच्या जीवावर बेतू शकते. शासनाने लाखो रुपये रुग्णवाहिकेवर खर्च केला आहे तो वाया जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच ही रूग्णवाहिका सध्या वापरातच नसल्यामुळे रूग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला जर शासनामार्फत वेतन देण्यात येत असेल तर ते सर्वप्रथम बंद करणे आवश्यक आहे.
येथे अनेक वेळा डॉक्टरच उपलब्ध नसतात. परिणामी दांडी मारणाऱ्या डॉक्टरांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच काही दुर्घटना रात्रीच्या वेळी देखील घडत असल्यामुळे रूग्णांवर तत्काळ उपचार होणे गरजेचे असते. परंतु रात्रीच्या वेळी येथे डॉक्टर कधीच उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो व सध्या लॉकडाऊनमुळे तेथेही जाणे शक्य नसल्यामुळे रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या विभागात अपघात झाला किंवा विषारी जनावर चावल्यास त्याला तातडीने पुढील उपचारासाठी पेण येथील उपजिल्हा रूग्णालयाकडे स्वखर्चाने घेऊन जावे लागते. परिणामी वेळेवर न पोहोचल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हे रूग्णालय सध्या आजारी पडल्याच्या अवस्थेत दिसत आहे. विशेष म्हणजे रूग्णालयातील या गैरसोयींबाबत येथील ग्रामपंचायतीची भूमिका मात्र उदासीन आहे, हे येथील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.!
पेण तालुक्यातील वाशी विभागात वढाव, काळेश्री, कणे, वाशी, बोर्झे अशा एकूण ५ ग्रामपंचायतींचा समावेश असून येथील लोकसंख्या १५ हजारांपेक्षाही अधिक आहे. मात्र एवढी लोकसंख्या असताना देखील या आरोग्य केंद्रात अशा प्रकारची गैरसोय कायम आहे. परिणामी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन येथे रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, तसेच दिवसाच्या वेळीही दांडी न मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व येथील रूग्णवाहिका ड्रायव्हर आभावी बंद असल्यामुळे या रूग्णवाहिकेवर योग्य प्रकारे काम करणारा ड्रायव्हर नियुक्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.