पेण पूर्व विभागातील विक्रम मिनिडोअर चालक-मालकांना धान्य वाटप
लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाचे साधन बंद
पेण शहर (प्रशांत पोतदार) :
कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रसार संपूर्ण जगामध्ये दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे रोजच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. भारतात हे प्रमाण कमी असले तरी लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार व दळणवळण बंद असल्याने जिल्हयातील विक्रम मिनीडोअर टॅक्सीच्या चालक व मालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. ८० ते ८५ मिनीडोअर चालक मालक असून यातील जवळ जवळ ८० कुटुंबांना म्हणजेच किमान ३५० व्यक्तींना उपासमारीची थेट झळ सोसावी लागत आहे. या वस्तूस्थितीचे वर्णन करीत पेण पूर्व विभाग बापूजी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील व पूर्ण कमिटीतर्फे पेण पूर्व विभागातील सर्व चालक मालकांना धान्य वाटप करण्यात आले. खरं तर गेली पंधरा ते वीस वर्ष व्यवसाय व नोकरीच्या शोधात असलेल्या असंख्य तरूणांनी तीन चाकी रिक्षा, विक्रम मिनिडोअर, टॅक्सी व त्यात पैसा अडका जमवून चार चाकीच्या टूरीस्ट वाहनांचा आधार घेत अशा व्यवसायात पदार्पण केले. हे सारे वाहनचालक आज केवळ या कोरोनाच्या उपाययोजनेतील लाॅकडाऊनमुळे घरात बसून आहेत. अर्थात लाॅकडाऊन हा उपाय सर्वांनीच मान्य केला आहे. कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लाॅकडाऊन आवश्यकच आहे. पण दुसरीकडे रोजचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद असल्याने उपासमारीचीही दुदैवी वेळ या सर्वांवर आली आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी व्यक्त केले त्याच अनुषंगाने प्रत्येक चालक-मालकला संघटनेच्या वतीने धान्य वाटप करण्यात आहे.