शाळा बंद पण शिक्षण आहे, संकल्पनेला शिक्षक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !
माणगांव (उत्तम तांबे) : जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळा, कार्यालये यांना सुट्टी देण्यात आली असून इयत्ता दहावी पर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन द्वितीय सत्राच्या अगोदरच कोरोनामुळे शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने द्वितीय सत्र परीक्षा व विध्यार्थी अभ्यासावर याचा परिणाम झाला होता. जास्त दिवस विध्यार्थी अभ्यासपासून दूर राहणे शैक्षणिक दृष्ट्या परवडणारे नसून या बाबीवर पर्याय म्हणून शाळा बंद पण शिक्षण आहे ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात रुजू होत असून समाज माध्यमाचा उपयोग करून विध्यार्थ्यांना अध्ययन करण्यास प्रवृत्त केले जात आहे. शिक्षण विभागाने यासाठी प्रयत्न केले असून दिक्षा शैक्षणिक अॅप व इतर दुवे वापरून अभ्यास करण्यासाठी विध्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत उद्युक्त केले जात आहे. शिक्षणात जास्तीत जास्त समाज माध्यमांचा वापर करावा यासाठी शाळा, शिक्षक व पालकही आग्रही असून विध्यार्थी घरबसल्या अभ्यास करत असल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षकांनी इयत्ता नुसार व्हाट्स अॅप गट तयार केले आहेत. त्या माध्यमातून दररोज विध्यार्थ्यांना विविधांगी अभ्यास दिला जातो व तपासणी केली जाते. शाळा नाही पण शिक्षण आहे, ही संकल्पना रूढ होत असून महामारीच्या या संकटात समाज माध्यमांचा शिक्षण क्षेत्रात वाढता वापर विध्यार्थी अध्ययन अध्यापनासाठी हिताचा आहे.