खंडाळा घाटात (बोरघाट) द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १९० वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा होणार


रायगड (किरण बाथम) : 
तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा असलेला हा पूल पाडण्यास रस्ते विकास महामंडळाच्या वतीने 'लाॅकडाऊन' चा मुहूर्त काढला असून, उद्यापासून पूल पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या वतीने नियंत्रित स्फोटकांचा वापर करत सदर पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी ४ ते १४ एप्रिल दरम्यानचा कालावधी निश्चित करण्यात आला असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

पर्यायी वाहतूक जुन्या राष्ट्रीय महामार्गाने

या कालावधी दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजूला जाणारी वाहतूक द्रुतगती किमी क्र. ४४ अंडा पॉईंट येथून खंडाळा व लोणावळा शहरातून बाहेर काढण्यात येणार आहे. तर मुंबई दिशेकडे जाणारी वाहतूक किमी ५५ लोणावळा एक्झिट येथून खाली उतरवत लोणावळा व खंडाळा शहरातून अंडा पाईट येथे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे. अशाप्रकारे द्रुतगती मार्गावरील १० किमी अंतराची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

अमृतांजन पूल का ठरतोय गैरसोयीचा?

अमृतांजन पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र येतात. सदर मार्गाची आखणी झाल्यानंतर याठिकाणी पुलाच्या रचनेमुळे हा पूल तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा ठरत असल्याचे चित्र आहे. खंडाळा घाटात बोगद्याच्या पुढे आल्यावर अचानक येणारा तीव्र उतार व वळण यामुळे वाहनचालकांना वेगावर नियंत्रण राखता येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

अमृतांजन पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच असून, सरासरी रोज एक अपघात घडत आहे. याठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागला आहे.  मुंबई बाजूकडून घाट चढताना अमृतांजन पुलाजवळ तीव्र चढण व वळण असल्याने वेगवान वाहतुकीस पुलाची अडचण होत असून, अवजड वाहनांच्या वाहतुकीस हा पूल अडचणीचा ठरत आहे. यामुळे अपघात व वाहतुकीची मोठी कोंडी कायम होत असते. त्यामुळे अडचणीचा ठरणारा अमृतांजन पूल पाडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने तीन वर्षापूर्वी नागरिकांच्या सूचना, हरकती मागविण्यात येत समितीही नियुक्त करण्यात आली. मात्र, पुणे-मुंबई दरम्यान वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने सदर पूल पाडण्यासाठी अडचणी होत्या. मात्र, सध्या 'कोरोना' मुळे सर्वत्र लाॅकडाऊन करण्यात आल्याने संचारबंदी आहे. द्रुतगती मार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक तुरळक आहे. याचा फायदा उचलत महामंडळाच्या वतीने ऐतिहासिक पुल पाडण्यासाठी अखेर 'लाॅकडाऊन' मुहूर्त साधला आहे.

काय आहे इतिहास

भारतातील जुन्या व्यापारी मार्ग असलेल्या बोरघाटातील सध्याच्या रायगड व पुण्याच्या सीमेवर कोकण व दख्खन दरम्यान व्यापार वृद्धीसाठी ब्रिटीशांनी रेल्वेचे जाळे उभारण्यास सुरवात केली होती. यासाठी पुरक साहीत्य व सामानाची ने-आण करण्यासाठी त्यांना रस्ते बांधण्यात येत होते. पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यात येत असताना कठीण अशा बोरघाटातही रेल्वे मार्ग टाकण्याचे काम होते. यासाठी ब्रिटिशांनी बोरघाटात रस्त्यांचे जाळे तयार केले.

रेल्वे मार्गांची उभारणी होताच ब्रिटीश अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस याने सन १९ जानेवारी १८३० पुलाचा पाया रचला. मेजर जनरल सर जाॅन माल्कम यांच्या मार्गदर्शनाखाली १० नोव्हेंबर १८३० मध्ये केवळ अकरा महिन्यांच्या कालावधीत बोरघाटातील रेल्वेच्या `रिर्व्हसिंग पॅाइंट` येथे `लॅंडमार्क` ठरणाऱ्या प्रशस्त अशा पुलाची उभारणी केली.

पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करताना बऱ्याच वर्षांपूर्वी या पुलावर अमृतांजन बामची जाहीरात करणारे फलक लावण्यात आले होते. या जाहिरातीवरुनच यापुलास अमृतांजन पूल हे नाव पडले. आजही दिमाखात उभ्या असणाऱ्या या पुलाच्या सुमारे १९० वर्षांच्या या इतिहासाच्या पाऊलखूणा पुसल्या जाण्याची चिन्हे आहे.

Popular posts from this blog