कोरोना भस्मासूराचा नाश करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महिलाशक्ती खंबीर
घरात आपल्या कुटुंबाची काळजी वाहणाऱ्या महिला शक्तीला सलाम
माणगांव (प्रतिनिधी) :
कोरोना सारखे महाभयंकर संकट आणि ३ मे पर्यंत वाढलेल्या लाॅकडाऊन मुळे निर्माण झालेल्या विपरित कठीण परिस्थितीतही मोठ्या धैर्याने लढतेय एक महाशक्ती, ती आपल्या सर्वांना अचंबित करणारी आहे. साक्षात देवी दुर्गा मातेच्या रुपात या कोरोना भस्मासूराचा सामना करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील या महिलाशक्ती खंबीरपणे उभ्याठाकल्या आहेत. याचे साक्षात दर्शन उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविका (सिस्टर्स), आशा वर्कर्स यांच्या रूपात दिसून येत असून राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या तरुण पालकमंत्री ना. आदितीताई सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधि चौधरी यांच्या नेतृत्वात सक्रिय झालेल्या या स्त्रीशक्तीला त्रिवार सलाम करीत रायगडवासियांना त्यांचे कौतुक वाटत आहे. घरातील सर्वांची काळजी वाहणाऱ्या सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
याला कारण असे कि माणगांव मधिल कर्तव्यतत्पर प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे, नगरपंचायत नगराध्यक्षा योगिता चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक प्रियंका बुरुंगले तसेच सर्व नगरसेविका, अंगणवाडी सेविका या महिला या लढ्यात एखाद्या विरांगणेच्या रुपात खंबीरपणे तोंडाला मास्क बांधुन, सर्व नियमांच सुरक्षिततेच भान राखुन व इतरांनीही ते राखावे यासाठी सरसावल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व निर्देश पाळत कोणीही गोरगरीब, मोलमजुरी करणारे परप्रांतिय या सर्वांना जिवनावश्यक वस्तूंचा पूरवठा व्हावा, कोठेही काळाबाजार होऊ नये, सर्वांना रेशन तसेच इतर शासकिय मदत देण्याचे हेतूने शासकिय योजनांचे सक्षम पणे नियोजन करीत संबंधित महसुल, प्रांत आपत्ती व्यवस्थापनेतील महिला कर्मचारी सुद्धा इतर पुरुष कर्मचाऱ्यां सोबत रास्तभाव धान्य वितरण तसेच इतरही नैसर्गिक आपत्ती पंचनामे, नुकसान भरपाई, कोरोना संबंधित माहीती सर्वेक्षण जनजागृती या कामांची चोखपणे व्यवस्था करण्यासाठी कार्य करीत आहेत.
तसेच भुकेलेल्यांना शिवभोजन, अत्यावश्यक अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तुंच्या पॅकेट्सचे वाटप करण्यासाठी सेवाभावी संस्थांना प्रोत्साहीत करुन कार्य करीत आहेत. सेवाभावी संस्थांमधील महिला स्वतःचे घरकाम सांभाळून गरजवंताना जेवण बनवून अन्नदान करीत आहेत. याचा आदर्श जिल्ह्यातील अनेकांनी घ्यावा, कोणतीही अभिलाषा नाही. कोरोनामुळे घरात असलेले आपले कुटुंब प्रपंच सांभाळून त्या निर्भीडपणे लढत आहेत, या साठीच पुरुषांपेक्षा कांकणभर सरस अस हे धैर्याच कार्य असून लोक त्यांना मानाचा मुजरा करीत आहेत. आपण नक्कीच हे कठीण युद्ध जिंकणार असा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. कोरोना संक्रमणावर मात करण्याची प्रचंड उर्जा महिलांमध्ये आहे हे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यातही या महिलाशक्तीचा साक्षात्कार दिसून येत आहे. महाड तालुक्यातील नगराध्यक्षा स्नेहल जगताप रोह्यातील तहसिलदार तसेच इतर तालुक्यातही कोरोना विषाणुच्या संकट काळातही जग हे विलक्षण तणावात असून रायगड जिल्ह्यातील या नेतृत्व करणाऱ्या धाडसी महिला, महिला पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, मदतनीस तसेच जिल्ह्यातील इतरही काही ज्ञात-अज्ञात महिला स्वत:च्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान बाळगत आहेत व त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व महिलांची नावे लिहणे शक्य नसले तरीही सर्व महिलांचे जनतेमधुन कौतुक होत आहे.