पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटाइजरचे वाटप कधी होणार?
नागरिकांचा संतप्त सवाल....
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगासह भारतात महाभयंकर कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वत्र महामारी पसरली आहे. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे चीन, फ्रांस, जर्मनी, इटली, अमेरिका इत्यादी देशातील हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्या नंतर या रोगाने आपल्या भारतात सर्वत्र संचार केला आहे.
कोरोना विषाणूचा भारतातील फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू करण्यात आले आहे. या लाॅकडाऊन च्या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊन मुळे स्वाभाविकच सर्व नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर कडक निर्बंध आले आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देशासह राज्यातील सर्व शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणेला आपापल्या विभागात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आणि माणगांव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्या त्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावातील नागरिकांना मोफत हॅन्ड सॅनिटाइजर, मास्कचे वाटप करून सर्व गावागावात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
परंतु असे असताना रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पेण तर्फे तळे, बोरघर आणि आमडोशी या गावातील नागरिकांना पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अद्याप कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मास्क, हॅन्ड सॅनिटाइजरचे वाटप अद्याप करण्यात आलेले नाही. शिवाय कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक निर्जंतुकीकरण फवारणी सुद्धा केलेली नाही. कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक खबरदारीच्या सदर उपाययोजना पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कधी करण्यात येणार असा नागरिकांमधून रास्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी माणगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सतीश गाढवे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप हळदे साहेब लक्ष देतील का ? याकडे नागरिकांचे लक्ष वेधून आहे.