लाॅकडाऊनमुळे विक्रम मिनिडोअर चालक-मालकांची होतेय उपासमार


कोरोना हा अपघात समजून विमा लाभ मिळावा अशी जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांची मागणी


खालापूर (संतोष शेवाळे) :
कोरोना या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रसार संपूर्ण जगामध्ये दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे रोजच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. भारतात हे प्रमाण कमी असले तरी लाॅकडाऊनमुळे सर्व व्यवहार व दळणवळण बंद असल्याने जिल्हयातील विक्रम मिनीडोअर टॅक्सीच्या चालक व मालक यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात १२ ते १५ हजार मिनीडोअर चालक मालक असून यातील जवळ जवळ १२ हजार कुटुंबांना म्हणजेच किमान ४८ हजार व्यक्तींना उपासमारीची थेट झळ सोसावी लागत आहे. या वस्तस्थितीचे वर्णन करीत जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी २५ मार्च रोजी ईमेलद्वारे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे.
खरं तर गेली पंधरा ते वीस वर्ष व्यवसाय व नोकरीच्या शोधात असलेल्या असंख्य तरूणांनी तीन चाकी रिक्षा, विक्रम मिनिडोअर टॅक्सी व त्यात पैसा अडका जमवून चार चाकीच्या टूरीस्ट वाहनांचा आधार घेत अशा व्यवसायात पदार्पण केले. हे सारे वाहनचालक आज केवळ या कोरोनाच्या उपाययोजनेतील लाॅकडाऊनमुळे घरात बसून आहेत. अर्थात लाॅकडाऊन हा उपाय सर्वांनीच मान्य केला आहे. कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लाॅकडाऊन आवश्यकच आहे. पण दुसरीकडे रोजचे ऊदरनिर्वाहाचे साधनच बंद असल्याने उपासमारीचीही दुदैवी वेळ या सर्वांवर आली आहे.
गेल्या वीस वर्षांत कर्जाने घेतलेल्या या मिनीडोअरच्या व्यवसायातून आपलं घर, शेती, लग्न, मुलाबाळांचे व मातापित्यांचं शिक्षण, संगोपन व आरोग्याची काळजी घेताना इथला तरूण पिचलेला असतानाच महापूर, अपघात, रस्त्यांची दुरावस्था, प्रशासकीय नियम व कायदे, मिळणाऱ्या असुविधा, गाडीचे कर्ज, गाडीचा विमा, दुरुस्ती व धंद्यातील स्पर्धा याचाही वेळोवेळी सामना हा चालक-मालक करीत आला आहे. यापेक्षा गेल्या महिन्याभरातील परीस्थिती फारच गंभीर आहे. हे संकट जागतिक आहे. म्हणूनच त्या दृष्टीने विक्रम मिनिडोअर असणाऱ्या या सर्वसामान्य नागरीकाला सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्याला रेशन कार्डावर रेशन देऊनही त्याला आर्थिक सहकार्य करायला पाहीजे असे मत विक्रम मिनीडोअर चालक-मालक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष विजयभाऊ पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे व्यक्त केले आहे.

सध्या जिल्ह्यातील सर्व विक्रम मिनीडोअर चालक मालक हे शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विरूद्धच्या लढाईत सहभागी आहेत याबद्दल त्यांचे कौतूक करायला पाहीजे. आम्ही शासनासोबत तर शासनही आमच्यासोबत पाहीजे अशी त्या सर्वांची भावना असून जिल्हाध्यक्ष पाटील यांनी या कोरोना अपघातग्रस्त कुटुंबांना विम्याचा लाभ मिळावा, लाॅकडाऊन काळातील कर्जाचे हफ्ते माफ करावेत, रेशन धान्य वाटपात अंत्योदय योजनेप्रमाणे लाभ मिळावा अशा मागण्या आपल्या निवेदनात त्यांनी केल्या आहेत.

कोरोना हे जागतिक संकट आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मिनीडोअर चालक मालक आज घरात बसला आहे. गाडी बाहेर काढणार तेव्हा त्याचे रोजचे पोट भरणार अशी परीस्थिती असलेल्या या सर्वसामान्य तरुणांवर झालेला हा एक अपघात समजून दरवर्षी १२ ते १३ हजारांचा विमा हप्ता घेणाऱ्या विमा कंपनीने विम्याचा लाभ द्यावा. यात तीन चाकी रीक्षा, विक्रम टॅक्सी, टुरीस्टचा व्यवसाय करणारे चालक यांचा समावेश करावा.
- विजयभाऊ पाटील
जिल्हाध्यक्ष - रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटना

Popular posts from this blog