हातभट्टीच्या तयार दारुची बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, दोन इसम आणि ४ लाखांचा माल जप्त
रायगड (किशोर केणी) :
सध्या "कोरोना (कोव्हीड-१९) विषाणू" प्रादुर्भावावर नियंत्रण घालण्याकरीता संपुर्ण देशात घोषित केलेल्या "संचार बंदी" काळात सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातलेले आहेत. याच संधीचा फायदा घेवून काही लोक रोहा परिसरात र्निमनुष्य भागातून, रात्रीच्या आधाराचा फायदा घेवून, चारचाकी वाहनांतून गावठी हातभट्टीच्या तयार दारुची बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांना मिळाली. सदर माहिती खातरजमा करुन, असे गैरकृत्य करणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून, त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांना दिले होते.
त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री. जे.ए.शेख यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फतीने खात्रीशिर माहिती प्राप्त केली असता रोहा परिसरातील तांबडी फाटा या निर्मनुष्य भागातून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून, चारचाकी वाहनांतून काही लोक स्वतः च्या आर्थिक फायद्याकरिता गावठी हातभट्टीच्या तयार दारुची बेकायदेशीररित्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. शेख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.ह./२१०१ सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करुन, त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देवून, छापा कारवाईच्या सुचना दिल्या.
त्यानुसार दिनांक ०६/०४/२०२० रोजी पो.ह./२१०१ सुभाष पाटील आणि त्यांच्या पथकाने तांबडी फाटा येथील ताम्हाणी फार्म हाउस जवळ सापळा लावला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तेथून जाणाऱ्या महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच ०६/बी डब्ल्यु ०२७० या वाहनास थांबवून त्यामधील इसम (१) रविंद्र रामा गोरे व (२) प्रकाश रामा गोरे, दोन्ही रा. झापडी, पो. खारगाव ता. रोहा यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहनाचे कागदपत्र व वाहन चालक परवान्याची मागणी केली असता त्यांचेजवळ यापैकी कोणतेही कागदपत्र नव्हते. तसेच वाहनात कोणता माल आहे, याबाबत त्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली. एकंदरीत त्यांच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने वाहनातील मालाची खातरजमा केली असता वाहनात एकुण ५ रबरी ट्युब आणि त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु असल्याचे आढळून आहे. ताब्यातील इसमांनी एका रबरी ट्युबमध्ये प्रत्येकी ३५ लिटर असे एकुण १७५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु असल्याचे सांगितले. नमुद इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द रोहा पोलीस ठाणे कॉ. गु. रजि. नं.३२/२०२०, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५((ई) सह मोटार वाहन अधि.कलम १३०, १७७, १४६,१९६,३/१८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रोहा पोलीस ठाणे करीत आहे. सदर छापा कारवाईत दोन इसमांना ताब्यात घेवून, त्यांचे प्रत्यक्ष ताबे-कब्जातून वाहनासह एकुण ४,०५,२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. जे. ए. शेख, पो.ह./२१०१ सुभाष पाटील, पो.ना./१३०९ राजेंद्र गाणार, पो.ना./१३५९ सुनिल खराटे, पो.शि./८०१ विशाल आवळे या पथकाने केली आहे.