रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणे कंपनीने अन्नधान्याचे वाटप करुन जपली सामाजिक बांधिलकी
रायगड (किरण बाथम) :
रिलायन्स इंडस्ट्रिज नागोठणेतर्फे नुकतेच कंपनी परिसरातील आदिवासी वाड्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या आदिवासीवाड्या कुहिरे, कडसुरे, शिहू, वणी व वरवठणे ग्रामपंचायत हद्दीतल्या असून त्यामधे गंगवणे, चाफेवाडी, सरेवाडी, वस्लावाडी, धनगरवाडी, वरणावाडी, बंगालवाडी, ऐनावाडी, चिखली, किल्लावाडी, कागदावाडी, पायरावाडी, पारधीवाडी, नाईकवाडी, गायनाचीवाडी, झिमाडोह, चेराटी, कालकाई, ढेपेवाडी, गोयंडावाडी, वरवठणे कातकरवाडी, कुहिरे कातकरवाडी, शिहू कातकरवाडी, बोरावाडी ईत्यादी वाड्यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे कंपनी परिसरातील बेणसे, झोतिरपाडा, कुहिरे, कडसुरे, पिगोंडे (वेलशेत-आंबेघर), वणी, वरवठणे ग्रामपंचायत हद्दीतल्या गावांनाही कंपनीने धान्य पुरवठा करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. यांतील बऱ्याचशा आदिवासीवाड्या मुख्य रस्त्यापासून डोंगरावर खूप दूरवर आहेत. उन्हाळ्यात कच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो.
वाहतुकीची कोणतीही साधने नाहित. तर पावसाळ्यात बाजारपेठेत व कामाधंद्यास येण्यासाठी काही आदिवासी वाड्यांमधून चक्क तीन-चार तासांचा वेळ लागतो. "कोरोना"च्या पार्श्वभूमीवर आलेल्या जागतिक संकटकाळात प्रत्येकजण आपआपल्या परीने आपल्या आसपासच्या समाजासाठी मदत करत आहे.
अशा वेळी आपण सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे आणि म्हणूनच अशा मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या आदिवासी वाड्यांसाठी आम्ही कंपनी प्रेसिडेंट अविनाश श्रिखंडे व व्हाईस प्रेसिडेंट चेतन वाळंज यांच्या मार्गदर्शनाखाली योजना आखून आमच्या उद्योग समुहाकडून आम्ही मदत करण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे व त्याचप्रमाणे कंपनीपरिसरातील आजूबाजूच्या गावांसाठीही आम्ही वाटप करीत आहोत अशी माहीती कंपनी जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी दिली".
या सर्व गावांना वाटप त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सोबत घेउन करण्यात आले. त्याचप्रमाणे या पंचायतींना अन्नधान्य वाटप करताना बऱ्याच ठिकाणी उच्च सरकारी अधिकारी प्रांताधिकारी यशवंतराव माने, नागोठणे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, रोहा नायब तहसिलदार निलम ढोरजकर-सुर्यवंशी, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, रोहा पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी एम.जी.फडके, नागोठणे वनमुख्याधिकारी किरणकुमार सुर्यवंशी तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून आपली सामाजिक कर्तव्याची जबाबदारी जपली. या गावातील वाटपाचे सुयोग्य नियोजन जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, सहाय्यक उपाध्यक्ष कौशिक चक्रवर्ती, सी.एस.आर.च्या वरदा कुलकर्णी, अरविंद बुरुमकर यांनी केले.