लाॅकडाऊन काळात माणगांव बस स्थानकाने धारण केले सार्वजनिक भाजी मंडईचे स्वरूप
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगात महामारीचे थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण भारतभर लाॅकडाऊन सुरू केले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगातील अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या या महाभयंकर रोगापुढे हतबल झाले आहे. कारण या वर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.
कोरोना व्हायरस हा हवेतून पसरत नाही. तर तो बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे यावर प्रभावी उपाय म्हणजे लाॅकडाऊन आणि लाॅकडाऊनच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सेस म्हणजे या संपूर्ण लाॅकडाऊनच्या काळात एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीने विशिष्ट अंतरावर राहून आपली दैनंदिन दिनचर्या ठेवणे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील माणगांव नगर पंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाकी सर्व बाबींवर निर्बंध घातले आहेत. याकरिता माणगांव शहरातील सर्व किराणा व भाजीपाल्याची दुकाने दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुली ठेवली आहेत. तर माणगांव बाजारपेठेत लोंकाची गर्दी होऊ नये म्हणून घरातील केवळ एकाच सदस्याने बाजारात जाऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याचा नियम केला. आणि शहरातील भाजीपाल्याच्या दुकानांची व्यवस्था सद्या लाॅकडाऊन मुळे बंद असलेल्या माणगांव बस स्थानकात तूर्त स्वरूपात केली आहे. त्यामुळे एरवी एसटी महामंडळाच्या बसेस आणि प्रवाशांनी गजबजलेल्या माणगांव बस स्थानकाला लाॅकडाऊन मुळे सद्या भाजी मंडई तथा भाजीमार्केटचे स्वरूप प्राप्त झाले आहे.