मिडिया इफेक्ट ! वृत्तपत्रांत बातमी प्रसारित होताच पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीने केले सॅनिटाइजरचे वाटप
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगासह भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य रोगाने अक्षरशः थैमान घातले आहे. या महाभयंकर रोगाने भारतासह संपूर्ण जगातील हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. संपूर्ण भारतात सुद्धा या रोगाचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरू आहे. भारतातील कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू केले असून नागरिकांना या संदर्भात खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.
कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने त्या त्या विभागातील सरकारी यंत्रणेला कामाला लाऊन त्यांच्या माध्यमातून देशातील सर्व ठिकाणच्या नागरिकांना मोफत आरोग्यसेवा हॅन्ड सॅनिटाइजर, मास्क, नागरी वस्तीत सर्वत्र निर्जंतुकीकरण द्रव्याची फवारणी करण्या संदर्भात सर्व सुचना दिल्या आहेत. मात्र असे असताना सुद्धा रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात असलेल्या पेण तर्फे तळे या ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील पेण तर्फे तळे, बोरघर आणि आमडोशी या तिन्ही गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या आरोग्य निधीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फेस मास्क, हॅन्ड सॅनिटाइजर किंवा ग्रामीण भागात निर्जंतुकीकरण द्रव्याची फवारणी केली नाही.
सदरची अत्यंत गंभीर बाब माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बोरघर या गावचे सुपुत्र तथा माणगांव तालुक्यातील एक निर्भीड पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड यांनी सर्व वृत्तपत्रांमध्ये याबाबतची बातमी प्रसिद्ध करून या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या व संबंधित वरिष्ठ अधिकारी, माणगांव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. सतीश गाढवे आणि रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप हळदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सोमवार दिनांक १३ एप्रिल रोजी पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सौ. रसिका कळंबे मॅडम, उपसरपंच श्री. सुनील पेणकर, ग्रामसेवक श्री. राकेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष कळंबे, बोरघर पोलीस पाटील विजय कळंबे, ग्रामपंचायत कर्मचारी विनायक मोंडे आणि शशिकांत श्रीवर्धनकर यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावात येऊन प्रत्येक घरात एक बाटली या प्रमाणे केवळ हॅन्ड सॅनिटाइजरच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.