मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशन कडून १ लाख रुपयांचा धनादेश माणगांव तहसीलदारांकडे सुपूर्द!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : राज्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला मदत म्हणून माणगाव तालुक्यातील मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबालशेट धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता १ लाख रुपयांचा धनादेश माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे यांच्याकडे सुपूर्द केला.
राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीच्या सदर संकटात सापडलेल्या सर्व समाजातील गरीब गरजू सर्व धर्मीय समाज बांधवांना मोर्बा मुस्लिम समाजाने जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे मोठया प्रमाणात वाटप मोर्बा विभागात केले. त्याच बरोबर मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून गरीब जनतेला अन्नधान्याच्या स्वरूपाने मदत केली. या शिवाय कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे यांच्याकडे लाॅकडाऊन संचारबंदी आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून सुपूर्द केला.
या प्रसंगी मोर्बा उपसरपंच इकबाल हर्णेकर, अल्ताफदादा धनसे, फाऊंडेशनचे सचिव मौलाना अब्दुल सलाम राऊत, कार्यकारिणी सदस्य जहीर धनसे, निजामुद्दीन राऊत, पोलीस पाटील उस्मान धनसे, बशिर किरकिरे इम्रान राऊत आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात मोर्बा युथ फाऊंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे समाजात सामजिक बांधिलकी ठेवून विधायक कामे करीत आहे. सदर संस्थेची अद्यावत अशी रुग्णवाहिका आहे.
मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोर्बा विभागातील मोर्बा ग्रामपंचायत, मोर्बा स्टँड, निळगुण व नाईटने आदी गावांतून थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आले आहेत. बहुजन समाजासाठी ही संस्था कार्य करीत असून समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना तसेच अडचणीत असणाऱ्या लोकांना हे फाऊंडेशन मदत करीत असते. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सरकारला मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता १ लाख रुपयांचा धनादेश फाऊंडेशनतर्फे माणगाव तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात फाऊंडेशनने केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे यांनी त्यांचे आभार मानून त्यांनी माणगाव तालुक्यातील इतर सामाजिक, धार्मिक संस्थांनी, कंपन्यांनी, दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी याकामी स्वेच्छेने पुढे यावे असे आवाहन केले.