नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून नगरपंचायतीचे आवाहन
'बंद'ला सहकार्य केल्याबद्दल नगराध्यक्षांनी मानले आभार
माणगांव, दि. ५ एप्रील (उत्तम तांबे) :
माणगांव नगरपंचायतीने कोरोना (कोव्हीड 19) विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी, माणगांवकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीच माणगांवातील विविध सामाजिक, व्यापारी संस्थांशी नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक एकत्रित चर्चा - विचारविनीमय करुन तीन दिवस स्वयंस्फूर्तीने माणगांव बंदचे नियोजन केले होते. त्याला सर्व माणगांवकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल नगरपंचायतीने सर्वांचे आभार मानले आहेत. आता पुन्हा एकदा पूर्ववत मागील सूचने प्रमाणे दररोज सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजे पर्यंत बाजार पेठेतील अत्यावश्यक सेवा, भाजी, किराणा दुकाने पूर्वी प्रमाणेच चालू राहतील.
तसेच यावेळी योग्य नियोजन म्हणून प्रांताधिकारी व तहसिलदार तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा विनीमय करुन लाॅकडाऊनचे कालावधीत एसटी स्टँडच्या आवारात तसेच पंचायत समिती आवारात, भाजीपाला व फळविक्री करण्याचे नियोजन ठरले असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली आहे. नागरिकांनी गर्दी, गडबड न करता, सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) या नियमांचे पालन करुनच व काही दुकानांसमोरील आखलेल्या सुरक्षा वर्तुळात, चौकोनात किंवा आखलेल्या पट्टी रेषेवर ओळीत उभे राहूनच आपआपली खरेदी करुन घरी जावे. बाजारात येतानाही शक्यतो एकट्या दुकट्यानेच सामान खरेदीचे योग्य नियोजन करुन यावे, जेणे करुन गर्दी होणार नाही. बाजारात येताना कापडी पिशवी सोबत आणावी. तसेच प्रत्येकाने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अत्यंत महत्त्वाचे आहे .
आपली काळजी आपणच घेऊया ! आपल्या आजुबाजूस शेजारीपाजारी याविषयी कोणीही संशयास्पद आढळले, आजारी असेल तर नगरपंचायत कार्यालयात तात्काळ माहीती करुन द्या, घाबरुन जाऊ नये. मागील तीन दिवस बंद असल्यामुळे आता एकदम गर्दी होणार नाही याचीही आपण सर्वांनी खबरदारी बाळगा. आपले शासन कोणत्याही जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही, याची काळजी घेत आहे. गर्दी टाळा असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. कृपया सर्वांचे पुन्हा एकदा सहकार्य अपेक्षित आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सर्व माणगांवकरांचे कर्तव्य आहे. हा लढा आपण जिंकणारच आहोत.
कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून फक्त संयम, संकल्प, स्वयंशिस्तीने आणि वेळोवेळी पोलीस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुनच यावेळेस सुरक्षित अंतर ठेऊनच ती आपल्याला लढावी लागत आहे, हे लक्षात असू द्यात. ही वेगळी लढाई आहे, सर्वांनी सहकार्य केल्यास या कठीण परिस्थितीतून आपण लवकर बाहेर पडून, जनजीवन पूर्ववत होण्याच्या दृष्टीकोनातून ते एक महत्वाच पाऊल ठरेल. शक्यतो घरीच रहा, काळजी घ्या, असे माणगांव नगरीच्या प्रथम नागरिक म्हणून नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांनी जनतेला भावनिक आवाहन करीत जनतेचे आभार मानले आहेत.